घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत मृतांचा आकडा १ हजार पार; १४३० नवे रुग्ण...

Corona Live Update: मुंबईत मृतांचा आकडा १ हजार पार; १४३० नवे रुग्ण सापडले!

Subscribe

शहापूर तालुक्यात आणखी एका ५६ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी माहिती आरोग्य विभागाने सोमवारी दिली आहे. हा शहापूर तालुक्यातील कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे. यापूर्वी शहापूर शहरातील एका ६७ वर्षीय वृध्दास करानाची लागण झालेली होती त्याचा देखील ठाणे येथील होरीझोन हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.


मुंबईत मृतांचा आकडा १ हजार पार; १४३० नवे रुग्ण सापडले!

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुंबईत आजदेखील देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात मुंबईत १४३० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या ५२ हजार ६६७ रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ३१ हजार ७८९ रुग्ण झाले आहेत. मुंबईत मृतांचा आकडा देखील सर्वाधिक असून आज दिवसभरात ३८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासह मुंबईतल्या मृतांचा आकडा एक हजारांच्या वर गेला आहे. मुंबईत एकूण १०२६ रुग्णांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आज ३३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचाही आकडा ८४०४ झाला आहे. मात्र, मृतांचा आकडा एक हजारांच्या वर जाणं ही मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. (सविस्तर वाचा)


धारावीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्के!

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्ण आता बरे होवून घरी परतू लागले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण मुंबईत २७ टक्के एवढे आहे. मात्र, दादर-माहीम व धारावी या जी-उत्तर विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३७ टक्के असून धारावीत हे प्रमाण ४२ टक्के एवढे असल्याचे दिसून येत आहे. धारावीत रुग्णांची संख्या तसेच मृतांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ४२ टक्क्यांवर आल्याने धारावीकरांसाठी मोठी दिलासाजनक बातमी आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत लॉकडाऊन जुलैपर्यंत राहणार?

राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन ४ सुरू असून, देशातील हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र ‘आपलं महानगर’ला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबईमध्ये जुलै महिन्यापर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मुंबईमध्ये लॉकडाऊन असताना देखील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नसल्यानेच मुंबईतील लॉकडाऊन आणखी वाढवण्याच्या विचारात ठाकरे सरकार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने तशी तयारी देखील केली असून, पुढील दोन महिन्यांचा मास्टरप्लान देखील राज्य सरकारने तयार केल्याचे समजते. सगळ्यात महत्वाचे राज्यातील कोरोनासाथीचे प्रमाण कमी होण्यास सप्टेंबर महिना उजाडणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. (सविस्तर वाचा)


 आज राज्यात २४३६ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६० जणांचा मृत्यू

आज पुन्हा राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला असून तब्बल २ हजार ४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५२ हजार ६६७ झाला आहे. त्यासोबतच राज्यात आज दिवसभरात ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १६९५ झाला आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथिल केल्यानंतर अजूनही रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांसाठी हे एक मोठं आव्हान ठरलं आहे. त्यादरम्यान, बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र आज भर पडली आहे. आज दिवसभरात ११८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार ७८६ झाला आहे. (सविस्तर वाचा)


भिवंडीत एकाच दिवशी आढळले कोरोनाचे सतरा नवे रुग्ण

भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असता सोमवारी शहरात दहा तर ग्रामीण भागात ७ असे एकूण सतरा नवे रुग्ण आढळले आहेत. या १७ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १५८ वर पोहचला आहे. भिवंडी शहरातील १० करोना बाधीत रुग्णांपैकी शहरातील खंडूपाडा येथे राहणारे ४ रुग्ण हे उत्तर प्रदेश येथे धार्मिक सभा करून आले होते. तर २ रुग्ण हे गुजरात मधून आले होते. एक रुग्ण वंजारपट्टी नाका येथील असून आपल्या पॉझिटिव्ह कोरोनाबाधित वडिलांच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आढळला आहे. तर एक रुग्ण राहणार फुलेनगर येथील असून केईएम हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सरचे उपचार घेताना पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच २ रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील असल्याने कोरोनाबाधित झाले आहेत. अशा प्रकारे भिवंडी शहरात सोमवारी एकूण दहा नवे रुग्ण आढळले आहेत. या दहा नव्या रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८८ झाली असून त्यापैकी ३९ रुग्ण बरे झाले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर ग्रामीण भागातील खारबाव गावात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या चार जणांमध्ये ३२ वर्ष आणि ५८ वर्ष वयोगटातील दोन पुरुष तर २९ वर्ष आणि ३८ वर्ष वयोगटातील दोन महिलांचा समावेश आहे तर कोनगाव येथे तीन नवे रुग्ण आढळले असून ६५ वर्ष आणि ४९ वर्ष वयोगटातील दोन पुरुष तर ४५ वर्ष वयोगटातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या सात नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा ७० वर पोहचला आहे. तर ३३ रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ३६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता १५८ वर पोहचला असून त्यापैकी ७२ रुग्ण बरे झाले आहेत तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) चे व्यवस्थापक जीव्हीके एमआयएल यांच्यावतीने आज मुंबईहून विमानांचे उड्डाण करण्यात आहे. साधारण १४ सेक्टर्समधील ७ एअरलाईन्सच्या माध्यमातून ४७ विमानांचे उड्डाण झाले. यामधून एकूण ४ हजार ८५२ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यात ३ हजार ७५२ प्रवाशांनी मुंबईबाहेर तर १ हजार १०० प्रवाशांनी बाहेरून मुंबईत प्रवास केला. यातील दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक संख्या असल्याचे सीएसएमआयएने नमूद केले आहे. 


जे.जे. रुग्णालयाला ५० व्हेंटिलेटर

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रयत्नातून जे.जे. रुग्णालयाला ५० व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. कोरोना विरोधातल्या लढाईत औद्योगिक समूह देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याचाच एक भाग म्हणून अमेरिकन इंडिया फाऊंडेशने सीएसआर निधीच्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाला ५० व्हेंटिलेटर दिले. अस्लम शेख यांच्या हस्ते रुग्णालयाला व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. कोरोना विषाणूची लागण झालेल्या ज्या रुग्णांना श्वास घेण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो त्यांचे प्राण वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे यापुढे देखील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले.

कोव्हिड १९ विरोधातल्या लढ्यात  ‘एमएमआरसी’
मुंबईत एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए यासारख्या वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत कोव्हिड १९ च्या लढाईविरोधात तयारी सुरू असतानाच आता त्यामध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची भर पडली आहे. त्यामुळे आता १ हजार बेड्सची सुविधा आता एमएमआरसीमार्फतही मुंबईत दोन ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे दोन कोव्हिड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी एक ८०० खाटांचे अलगिकरण केंद्र दहिसर चेक नाका परिसरात उभारण्यात येणार आहे. येथे २०० ऑक्सिजनीटेड खाटा देखील उपलब्ध असतील तर कंदर पाडा, बोरिवली आरटीओ कार्यालया नजीक २५० खाटांचे कक्ष उभारण्यात येईल. येथे high dependency units (HDU) तसेच डायलिसिसची सुविधा असणारा अतिदक्षता विभाग देखील असणार आहे. या दोन्ही केंद्रांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दोन आठवड्याच्या आत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

अंबरनाथमध्ये २२ वर्षीय तरूणाचा कोरोनाने मृत्यू

अंबरनाथ शहरात कोरोना बाधितांची संख्या ६२ वर पोहचली असून रविवारी एका २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २ झाली आहे. नगरपालिकेच्या चार कर्मचायांनी अंबरनाथच्या मुस्लीम कब्रस्थानात त्या तरूणावर अंतिम संस्कार केले. सदर तरूण संजय नगरमधील रहिवासी होता. अंबरनाथमध्ये यापूर्वी बुवापाडा येथील रूग्णाचा मुंबई येथे कोरोना पाॅझिटिव्हने मृत्यू झाला होता. मात्र, अंबरनाथ पश्चिम भागातील संजय नगरमधील हा तरूण अंबरनाथमधील पहिला कोरोना बळी ठरला आहे .


रत्नागिरी जिल्ह्यात आज ११ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५६ वर पोहोचला आहे. कोकणात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने धाकधूक वाढली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना पॉझिटिव्ह कॅबिनेट मंत्र्याला एअरलिफ्ट नाकारले

महाविकास आघाडी सरकारमधील एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी काल आली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुबंई येथे उपचार घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना विमानाने मुंबईत आणले जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र अधिकाऱ्यांच्या लालफिती कारभारामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशनानंतरही सदर कॅबिनेट मंत्र्याला विमान मिळू शकले नाही. शेवटी नांदेड ते मुंबई असा ५७४ किमी आणि १२ तासांचा प्रवास या मंत्र्याला आता रुग्णवाहिकेतून करावा लागत आहे. (सविस्तर वाचा)


आरोग्य कर्मचार्‍याचा करोनामुळे मृत्यू

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंदातील कर्मचार्‍याचा नाशिक शहरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मृत कर्मचारी आजारी असल्याने उपचारासाठी विविध ठिकाणी भेट देत होते. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. अंबोली आरोग्य केंद पसिर व त्र्यंबकेश्वर बाजारपेठेत ग्रामस्थांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (सविस्तर वाचा)


लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गौडा यांच्यावर!

देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. ३१ मे देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्यावर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. आज ते दिल्लीहून बंगळुरूला पोहोचले. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की, उड्डाण सेवेनंतर ते क्वारंटाईन झाले नाही. याबद्दल स्पष्टीकरण देताना सदानंद गौडा म्हणाले की, मी मंत्री आहे आणि औषध मंत्रालयाचा प्रमुख आहे. (सविस्तर वाचा)


नाशिक बाजार समिती तीन दिवस बंद

सभापती संपतराव सकाळे : गेल्या दोन दिवसांत दोन करोना पॉझिटिव्ह (सविस्तर वाचा)


कोरोनाग्रस्त गर्भवती महिला रुग्णवाहिकेसाठी सहा तास प्रतीक्षेत

कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेसाठी तब्बल ६ तास प्रतीक्षा करावी लागल्याची घटना  रविवारी डोंबिवलीत घडली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव टाकल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिका मिळाली. कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याला रुग्णालयात चालत जाण्याचा प्रकार घडला होता. पुन्हा हा प्रकार घडल्याने डोंबिवलीकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (सविस्तर वाचा)


‘लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे दिल्लीतील कोरोनाचे रुग्ण वाढले’

देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत १० क्रमांकावर पोहोचला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज किंवा उद्या जाणारा कोरोनाचा हा आजार नाही. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे राजधानी दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आठवड्याभरात दिल्लीत ३ हजार ५०० रुग्ण वाढले आहेत. परंतु चिंता करू नका. कोरोनामुळे मृत्यूची संख्या कशी कमी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. (सविस्तर वाचा)


हवाई वाहतूक सुरु झाली असली तरी विमानात सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पुढचे १० दिवस विमानाचे बुकिंग झालेले आहे. मात्र दहा दिवसानंतर एअर इंडियाच्या विमानातील मधल्या सीटचे बुकिंग करता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.


दोन महिन्यांच्या दिर्घ विश्रांतीनंतर आज देशातील अनेक विमानतळांवरील विमानांनी उड्डाण घेतले. देशांतर्गत विमान वाहतूक सेवेला आजपासून परवानगी देण्यात आली. मात्र आज पहिल्याच दिवशी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या ३३२ विमानांपैकी ८० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून आली. कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केल्याची तक्रार प्रवाशांनी केली.


देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जात असताना आता मृत्यूच्या आकड्याने देखील ४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी भारतातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ४,०२४ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३८ हजार ८४० वर पोहोचला आहे.


पुणे शहर आणि जिल्ह्यात मागच्या २४ तासांत २५८ रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे शहरात १८६ जणांना लागण झालेली आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४६, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १८, पुणे कँटोन्मेंट भागात ८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ५,६९४ वर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -