Corona Live Update: मुंबईत २४ तासांत १५० नवे रुग्ण!

CoronaVirus
कोरोना व्हायरस

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५० रुग्ण सापडले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. याोबत मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ५४९ वर गेली आहे.


नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे ११ नवे रुग्ण सापडले. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५० वर. बेलापूरमध्ये एकाच कुटुंबातल्या ६ जणांना कोरोनाची लागण. याच कुटुंबात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याशिवाय वाशी आणि नेरूळमध्ये प्रत्येकी २ तर कोपरखैरणेमध्ये एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.


गेल्या २४ तासांत देशात ७९६ रुग्ण सापडले असून ३५ मृत्यू झाले आहेत. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार १५२वर पोहोचला असून देशभरात ३०८ मृत्यू झाले आहेत. त्यातले ३५ मृत्यू हे गेल्या २४ तासांत झाले आहेत.


अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकला प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे – केंद्रीय गृहविभाग प्रवक्ता


आयआयटी मुंबईकडून पालिका पुन्हा ५०० मास्कची मदत

कोरोनाचा सामना करताना डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध होत नसल्याने यापूर्वी आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी पालिका हॉस्पिटलला ७६०० ग्लोव्हज आणि २९९० मास्क जमा करून दिले होते. कोरोनाविरोधातील हा लढा कायम ठेवत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यानी सोमवारी पुन्हा ५०० मास्क केईएम हॉस्पिटलला उपलब्ध करून दिले.


नेवासे येथील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

नगरच्या जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी एका व्यक्तीचा स्त्राव चाचणी अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाला असून तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेवासे शहरातील ही पन्नास वर्षीय व्यक्ती असून त्याला सर्दी, दम लागणे आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी या व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुना चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते, तो अहवाल प्राप्त झाला असून ही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी ५ वाजता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जिल्ह्यांकडून मागवण्यात आलेल्या रेड, ऑरेंज आणि ग्रीनच्या अहवालाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्याचा कालावधी १४ एप्रिल म्हणजे उद्या संपत आहे. या अनुषंगाने पंतप्रधानांचे उद्याचे भाषण हे महत्त्वाचे असणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की संपणार, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच राज्याचा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. 

महाराष्ट्रात आज नव्याने ८२ रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता दोन हजारांच्या पुढे गेला आहे. आज पिंपरी चिंचवड ३, मुंबई ५९, मालेगाव १२, ठाणे ५, वसई विरार १ आणि पालघर येथे २ रुग्ण आढळून आले आहेत. काल एकूण रुग्णांची संख्या १९८२ होती आता ती २०६४ झाली आहे.


 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे.


ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत येणाऱ्या भिवंडीतील एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच इतर नागरिकांची तपासणी सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत दोन पोलीस ठाण्यामध्ये कोरोना बाधित अधिकारी सापडल्यामुळे ठाणे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


मुंबईतील धारावी ही कोरोनाची हॉटस्पॉट ठरत आहे. आज पुन्हा धारावीत नवे चार रुग्ण आढळून आले आहेत. आता धारावीत रुग्णांची एकूण संख्या ४७ झाली असून त्यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


देशात मृतांचा आकडा ३०० पार; एकूण रुग्ण ९ हजारांच्या वर

कोरोना व्हायरसने भारतात आता ३०८ लोकांचा बळी घेतला आहे. मागच्या २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण रुग्णांच्या आकड्यातही वाढ झाली आहे.

 


आरोग्य मंत्रालयाने रविवारी संध्याकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ हजार ४४७ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७४६ लोक बरे झाले आहेत. तर २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे.