घरCORONA UPDATECorona Live Update: तुम्ही महाराष्ट्रात आहात, घाबरू नका, वांद्र्यातल्या मजुरांना उद्धव ठाकरेंचा...

Corona Live Update: तुम्ही महाराष्ट्रात आहात, घाबरू नका, वांद्र्यातल्या मजुरांना उद्धव ठाकरेंचा संदेश

Subscribe
निवृत्त कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. आज सकाळपर्यंत २१ हजार जणांनी नोंदणी केली आहे. आता त्यांची छाननी सुरू असून विभागवार यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. – उद्धव ठाकरे
इतर राज्यांमधून इथे आलेले काही प्रमाणात घाबरलेत. पण आम्हाला तुम्हाला घरात डांबून ठेवण्याचा आनंद होत नाहीये. आम्ही तुमची काळजी घेण्यासाठी आहोत. तुम्ही काळजी घेऊन राहा इथे. त्यांच्यासाठी काही कमी पडलं, तर तेही आम्ही करत आहोत. कुणाचीही इच्छा नाही की तुम्हाला असं बंद करून ठेवावं. ज्या दिवशी लॉकडाऊन उघडेल, त्या दिवशी तुमची व्यवस्था केलीच जाईल. तुम्ही महाराष्ट्रात आहात. काळजी करू नका. – उद्धव ठाकरे
पण या मुद्द्यावर कुणी राजकारण करू नका. या लोकांच्या भावनांशी खेळून जर कुणी राजकारण केलं, तर महाराष्ट्र सरकार त्याला सोडणार नाही. उगीच गैरसमजाची पिल्लं सोडून त्याला वेगळा रंग देऊन आग भडकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत. पण त्यांना मी आग लावू देणार नाही. सगळ्या पक्षांचे नेते हातात हात धरून लढत आहेत. – उद्धव ठाकरे
हा व्हायरस जात, पात, धर्म, पक्ष बघत नाही. तो कुणालाही ग्रासू शकतो. जेवढं लवकर आपण या कोरोनाला परतवू, तेवढ्या लवकर हा लॉकडाऊन निघेल. आपल्या एकजुटीच्या जोरावरच आपण त्याला पराभूत करू शकतो. घरीच आराम करा… आरामात आपण हे युद्ध जिंकू. – उद्धव ठाकरे

२० तारखेनंतर कोणते उद्योग सुरू करता येतील, कसे सुरू करता येतील याविषयी अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल.

आपण आजपर्यंत कोरोनाच्या विषाणूला बऱ्यापैकी थोपवलं आहे. १० जिल्ह्यांमध्ये त्याला प्रवेश दिलेला नाही. इतर जिल्ह्यांतून देखील त्याला पिटाळून लावायचं आहे. मुंबई-पुण्यात विमानतळ आणि इतर गोष्टींमुळे आपण जास्त खबरदारी करत आहोत. सील केलेल्या क्षेत्रात जास्त काळजी घेतली जात आहे. कंटेनमेंट झोनमध्ये एखादा दिवस गैरसोय होते. पण तिथे लवकरात लवकर अन्नधान्य, भाजीपाला, किराणाचा पुरवठा आपण करतोय.

- Advertisement -

महाराष्ट्रात प्लाझ्मा उपचारांचा प्रयोग करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. यातून कदाचित उद्या महाराष्ट्र जगाला दिशा दाखवू शकेल.

कुणालातरी वाटतं की पैसे इतर मार्गांनी का उभे करत नाही? पण पैसे काढण्याचे धंदे आपण करत नाही आणि ते आपल्याला करायचेही नाहीत. जिथे ज्या गोष्टींची कमतरता आहे, ती आपण देतोय. काही उद्योजकही पीपीई किटसारख्या गोष्टी देण्यासाठी पुढे आले आहेत.

- Advertisement -

ही वेळ राजकारणाची नाही. आत्ताचं संकट धीरानं लढून परतवण्याचं आहे. ते जर आपण केलं नाही तर दुसऱ्या शत्रूची आपल्याला गरजच नाही.


कोविडच्या बरोबरीचं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यासाठीही आपण दोन गट स्थापन केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिगट काम करत आहे. त्यासोबत वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांप्रमाणेच डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या तज्ज्ञांसोबत विजय केळकर, दीपकभाई पारेख, अजित रानडे यांची एक अर्थतज्ज्ञांची टीम तयार केली आहे. या आर्थिक संकटाचा परिणाम कसा कमी करायचा आणि पुढे काय उपाययोजना करायच्या, यावर हे गट अहवाल देणार आहेत.- उद्धव ठाकरे


काहींना वाटतंय की महाराष्ट्रात काहीतरी विचित्र चाललंय. देशभरात जितक्या चाचण्या झाल्या नसतील, तेवढ्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकार धैर्याने या संकटाचा मुकाबला करत आहे. शक्य ते सगळं आपण करत आहोत. महाराष्ट्रात २३० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेत. ३२ रुग्णांची परिस्थिती काहीशी गंभीर आहे पण स्थिर आहे.

आज मी दोघांशी बोललो. एक आहे तनिष्क मोरे. ६ महिन्यांच्या बाळाच्या आईशी बोललो. त्या बाळानं कोरोनाला हरवलंय. त्यानंतर मी एका ८३ वर्षांच्या आजींशी बोललो. त्यासुद्धा कोरोनाविरूद्ध जिंकल्या आहेत. – उद्धव ठाकरे


आज सकाळी पंतप्रधानांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. २ दिवसांपूर्वी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, तेव्हा मी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला. ही परिस्थिती आपल्या नियंत्रणात आली असली-नसली, तरी हा लढा गांभीर्याने घ्यायला हवा. – उद्धव ठाकरे


मला कल्पना आहे की जी परिस्थिती जगावर ओढवली आहे, त्यात सर्व जात-पात-धर्मांनी आपले उत्सव आवरते घेतले आहेत. मला खासकरून भीमसैनिकांना धन्यवाद द्यायचे आहेत. या काळात शिवतीर्थावर भीमसागर एकत्र येतो. पण आज त्यांनी शिस्त पाळून गर्दी न करता आपापल्या घरातूनच बाबासाहेबांना मानवंदना दिली – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री


मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये २०४ नवे रुग्ण सापडले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीसह मुंबईच्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १७५३ वर पोहोचला आहे. याशिवाय आज दिवसभरात २३ रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढून १६४वर गेला आहे.


वांद्रे पश्चिम येथे जमलेले हे सर्व रोजंदारी वर काम करणारे मजूर आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे घरात अन्नाचा कण नसल्यामुळे मजुरांचे हालहाल होत आहे. त्यात आणखी 3 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवल्यामुळे मजुरांची उरला सुरला संयम तुटला आणि हजारो मजूर रस्त्यावर उतरले असून आम्हाला गावी पाठवा अशी मागणी करीत आहे.


२४ तासांमध्ये देशभरात ३९ मृत्यू झाले असून एकूण मृतांचा आकडा ३३९पर्यंत गेला आहे. तसेच, २४ तासांत देशात १२११ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे देशभरात कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, गेल्या २४ तासांत देशात २१ हजार ६६५ चाचण्या झाल्या असून आत्तापर्यंत देशात करण्यात आलेल्या चाचण्यांची एकूण संख्या २ लाख ३१ हजार ९०२ इतकी आहे, अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय आत्तापर्यंत देशभरात १ हजार ३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत.


येथील उप जिल्हा रुग्णालयात ९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या ३ वर्षीय मुलीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांनी दिली आहे. वीटभट्टी कामगाराची ही मुलगी असून तीला सर्दी, ताप आणि खोकला झाल्यामुळे ९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी तीच्या घशाचे नमुने घेण्यात आले असता, आज तिचा रिपोर्ट प्राप्त झाला. डहाणूमध्ये हे वृत्त पसरताच, एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याबाबत लोकांमध्ये बातमी पसरली असली तरी जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेच्या हेल्प लाईन वर याविषयी काहीही माहिती उपलब्ध नव्हती.


‘तर या ठिकाणचा लॉकडाऊन मागे घेणार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ३ मे पर्यंत १९ दिवसांचा दुसरा लॉकडाऊनचा टप्पा जाहीर केला. मात्र या लॉकडाऊनमधून काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

२० एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्यावर बारकाईने लक्ष दिले जाईल. जे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट कमी करण्यात यशस्वी होतील, त्या ठिकाणी लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सशर्त सूट देण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधात आपण अधिक कडक उपाययोजना करणार आहोत. देशातील लोकांनी सहकार्य केल्यामुळेच आपण इतर देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो आहोत. मात्र यापुढे राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरावर बारीक नजर ठेवली जाईल. कोरोनाचे हॉटस्पॉट वाढणार नाही, याकडे लक्ष द्यायचे आहे. पुढील काळात लॉकडाऊनचे नियम पाळले गेले नाहीत, तर कारवाई केली जाईल. त्यामुळे बेजबाबदार वर्तन करु नका, असे आवाहन मोदी यांनी केले.


सरकारच्या वतीने नवीन गाईड लाईन दिली जाणार – पंतप्रधान


जे प्रदेश २० एप्रिलपर्यंत आळा घालतील तेथील नियम शिथील – पंतप्रधान


२० एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्याचे मूल्याकन करु – पंतप्रधान


देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे – पंतप्रधान


अनेक देशामध्ये हजारोच्या संख्येने मृत्यू झाले आहेत. – पंतप्रधान


समस्या दिसताच आपण त्यावर उपाय केले – पंतप्रधान


अनेक सार्वजनिक स्थळे आपण तात्काळ बंद केली – पंतप्रधान


एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येक जण आपले कर्तव्य निभावतोय – पंतप्रधान


कोरोनाविरोधात भारताची लढाई मजबूत – पंतप्रधान


तुम्ही अनंत कष्ट करुन देशाला वाचवले – पंतप्रधान


फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी फ्रान्समधील लॉकडाऊन ११ मे पर्यंत वाढविले आहे.


कोरोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलेला होता. या दिवसांत कोरोनाच कहर आटोक्यात राहिला असला तरी तो थांबलेला नाही. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. लॉकडाऊन घोषित केला त्यावेळी भारतात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांची संख्या आज जवळपास ३५० पर्यंत पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -