कटेंनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे उघडणार

All establishments in Sangamnera closed till May 26
लॉकडाऊन वाढवला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लॉकडाऊनचे नियम काय असतील ते देखील सरकारने जाहीर केले आहे. कटेंनमेंट झोनच्या बाहेर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. ही नवीन नियमावाली १ जून ते ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे. या लॉकडाऊनला Unlock 1 असेही नाव देण्यात आले आहेत. याचा अर्थ लॉकडाऊनसोबत काही गोष्टी हळुहळु उघडल्या जाणार आहेत.

नव्या नियमानुसार रात्री कर्फ्यू लावला जाणार आहे. रात्री ९ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे, मात्र अत्यावश्यक बाबींसाठी कर्फ्यूची बाधा राहणार नाही. याआधी संध्याकाली ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यूची मर्यादा होती. हा लॉकडाऊन कटेंनमेंट झोनमध्ये असल्यामुळे कटेंनमेंट झोन ठरविण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या नियमानुसार कटेंनमेंट झोन ठरविला जाईल.

या लॉकडाऊनदरम्यान फेज १ मध्ये धार्मिक स्थळांना मुभा दिली जाणार आहे. ८ जूनपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र कंटेनमेंट झोनमधील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स देखील सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालय याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल.

लॉकडाऊनच्या फेज २ मध्ये शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केली जाईल. राज्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकांनंतर जुलै महिन्यात शैक्षणिक संस्था सुरु करण्यासंबंधि निर्णय घेण्यात येईल.

फेज ३ मध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो, सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल, उद्याने, सभागृह देखील सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.