घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणा

आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणा

Subscribe

मानखुर्दची एस.एम.एस. कंपनी बंद करण्याची मागणी

मानखुर्द येथील एस.एम.एस. कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे राज्य प्रमुख आमदार अबू आझमी यांनी काल मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधले. अनेकदा मागणी करूनही मानखुर्दमधील जनतेच्या त्रासाला कारण ठरलेल्या एस.एम.एस कंपनीवर कारवाई करण्याबाबत होत असलेल्या चालढकलीचा निषेध आझमी यांनी मंत्रालयासमोर केला.

मंत्रिमंडळाची बैठक असल्याने सकाळच्या सुमारास अबू आझमी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाकडे पोहोचले होते. मानखुर्दच्या जनतेला त्रासाच्या ठरलेल्या एस.एम.एस.कडून होत असलेल्या पर्यावरण र्‍हासाची दखल घेत कंपनीचे काम थांबवावे, अशी मागणी आझमी गेल्या काही महिन्यांपासून करत होते. मात्र, त्याची दखल आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण खात्याने घेतली नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याबद्दल अबू आझमी यांनी मंत्र्यांचे अनेकदा लक्ष वेधले. पण तरीही कारवाई होत नव्हती.

- Advertisement -

आमच्या पक्षाने आघाडी सरकारला पाठिंबा देऊनही आमची कामे होत नसतील, तर नाराजी व्यक्त करणे आमचे काम आहे, असे सांगत त्यांनी आंदोलनाचे समर्थन केले. जनतेच्या जीविताला न जुमानणार्‍या कंपनीविरोधात कारवाई करावी, म्हणून मंत्र्यांना अनेकदा तक्रारी केल्या, फोन केले. पण फोन उचलण्याचे सौजन्यही मंत्र्यांकडून दाखवले जात नसल्याची आझमी यांनी तक्रार केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -