मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते कळंबोलीतील कोवीड केंद्राचे लोकार्पण

कोविड काळात सर्वाधिक रुग्ण सुविधा देणारा महाराष्ट्र अव्वल

Dedication of covid Center at Kalamboli by Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते कळंबोलीतील कोवीड केंद्राचे लोकार्पण

सिडकोने उभारलेल्या कळंबोली आणि कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल माध्यमाद्वारे करण्यात आले. कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण व सिडकोच्या इन्व्हेस्टमेन्ट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीट (आभासी-व्हर्च्युअल) चा शुभारंभही यावेळी पार पडला. सिडकोने कोविड काळात अगदी कमी वेळेत सर्व सोयींनी युक्त अशा आखीव रेखीव उभारण्यात आलेल्या कळंबोलीतील सर्व उपकरणांनी सज्ज कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कोरोनाच्या संकटात सर्व सुविधांनी युक्त रूग्णालये केवळ महाराष्ट्रानेच सुरू केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. भारतीय कापूस निगमच्या गोदामांमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड समर्पित आरोग्य केंद्राचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरण व ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला.

नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे ,महापालिकेचे नगरसेवक, आयुक्त गणेश देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे, पालिका उपायुक्त सचिन पवार, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,सिडको अधिकारी आदी उपस्थित होते. सुदृढ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चौरस आहार आवश्यक असतो, त्याप्रमाणेच विकाससुद्धा चौफेर आणि सर्वसमावेशक असावा, भविष्यातील गरजा ओळखून विकास कामांचे नियोजन करतांना होणारी कामे ही सुबक, दर्जेदार आणि देखणी असावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडकोने आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याची पंरपरा आपल्या कामाच्या माध्यामातून जपली आहे. नवी मुंबईत उद्योग, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. सिडकोने एक आदर्श शहर म्हणून नवी मुंबई उभारले आहे. सुंदर रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, क्रीडागंणे या सुविधा दिल्या आहेत. याशिवाय अल्प आणि मध्यम उत्पन्नाच्या नागरिकांसाठी निवारा देण्याचे कामही सिडको करत आहे. सिडकोच्या माध्यमातून होणार्‍या प्रकल्पामुळे नवी मुंबई, मुंबई व रायगडमध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, कोवीड काळात उपचाराच्या सुविधा निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे आपण कोवीडच्या दोन्ही लाटेला तोंड देऊ शकलो. तिसरी लाट येण्याची भीती आहे. ती आलीच तर आपण तयारीनिशी सज्ज आहोत. सिडकोने पुढाकार घेऊन दोन्ही कोवीड केंद्रे परिपूर्ण व सर्व सुविधायुक्त उभारली आहेत. त्याचप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून नवे विश्व उभारण्याचे काम सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री कु. तटकरे यांचेही यावेळी भाषण झाले. त्या म्हणाल्या, कळंबोलीतील अत्याधुनिक कोवीड आरोग्य केंद्रामुळे रायगडवासीयांसाठी मोठी सोय निर्माण झाली आहे. हे केंद्र महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर त्याची योग्य ती देखभाल केली जाईल. तिसरी लाट येऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, तिसर्‍या लाटेत लहान मुले व वृद्धांना असलेला धोका ओळखून या कोवीड केंद्रात विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे सांगताना सिडकोने अत्यंत कमी काळात सर्वसुविधायुक्त हे आरोग्य केंद्र उभारले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक व्यवस्थापक संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. रूग्णालयातील विविध विभागांची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार सहव्यवस्थापक संचालक कैलास शिंदे यांनी केले.

कळंबोलीतील कोवीड केंद्रातील सुविधा

* कळंबोलीतील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये केंद्राची उभारणी
* हे कोविड आरोग्य केंद्र पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये एकूण 635 खाटा आहेत.
* यामध्ये ५०५ ऑक्सिजनयुक्त खाटा, १२५ आयसीयू खाटा, (यातील २५ आयसीयू खाटा लहान मुलांसाठी राखीव)
* ५ खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव.
* रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी २४ खाटांचे मदर लाउंज
* संपर्क रहित तपासणी कक्ष, डॉक्टर आणि रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग, रूग्णांच्या देखरेखीसाठी आणि उपचारांसाठी हे आरोग्यकेंद्र सीसीटीव्ही, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम,आवश्यक आयटी इन्फ्रास्ट्रक्चर व वायफाय प्रणाली


हे ही वाचा – लाच घेताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना ACBकडून अटक