प्रस्तावित महाड-मढे घाट-पुणे या मार्गाची केंद्रीय मार्ग निधीत समावेश करण्याची मागणी

अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली

Demand for inclusion of proposed Mahad-Madhe Ghat-Pune route in Central Road Fund
प्रस्तावित महाड-मढे घाट-पुणे मार्ग केंद्रीय मार्ग निधीत समावेश करण्याची मागणी

महाड येथून रानवडी गावाजवळून मढे घाट मार्ग पुण्यात जाण्यासाठी प्रस्तावित मार्ग आहे. या मार्गाचे काम लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास महाड-भोर आणि महाड-ताम्हीणी मार्गे पुणे यापेक्षा जवळचा आणि कमी वेळेत प्रवास पूर्ण करणारा ठरणार आहे. यासाठी यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रयत्न केले होते. तालुका आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जुना असा महाड-वरंध-भोर-पुणे असा एक मार्ग अस्तित्त्वात आहे. मात्र हा मार्ग गेले काही वर्षे सातत्याने येणार्‍या दरडीने विस्कळीत होत आहे. शिवाय भाटघर धरणाच्या शेजारून जाणार्‍या या मार्गावरील प्रवास कंटाळवाणा होत आहे. त्यातच महाड-माणगाव-ताम्हीणी घाट-पुणे असा नवीन मार्ग अस्तित्वात आला. मात्र याचे अंतर देखील वाढले आहे. महाड-भोर-पंढरपूर हा जवळचा मार्ग असला तरी गेल्या अनेक वर्षांत पूर्ण दुरुस्ती न झाल्याने जागोजागी खड्डे, दरडींचा धोका वाढल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. याचा त्रास मात्र सर्वसामान्य माणसाला आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. पुणे येथील कोकण संवर्धन संघर्ष संघटनेच्यावतीने अध्यक्ष रवी कदम यांनी सुळे यांना महाड-कर्नावडी-पुणे हा मार्ग पूर्ण व्हावा याबाबत मागणी केली होती. याची दखल घेत सुळे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केलेल्या मागणी पत्रात या रस्त्याचा केंद्रीय मार्ग निधीत समावेश करून पूर्ण केला जावा, अशी मागणी केली.

हा मार्ग केवळ ९६ किलोमीटर इतक्या कमी अंतराचा होणार असून, सध्या अस्तित्त्वात असलेल्या महाड-भोर आणि महाड-ताम्हीणी मार्गापेक्षा ५४ किलोमीटरने कमी आहे. सद्यःस्थितीत पुणे ते मौजे केळद (जि. पुणे) हा राज्यमार्ग अस्तित्त्वात आहे. तर महाड बाजूकडून महाड ते मौजे कर्णवडी (जि. पुणे) हा मार्ग अस्तित्त्वात आहे. मौजे कर्णवडी ते मौजे केळद या दरम्यान उभा असलेला कडा, अर्थात खडक फोडून ४ किलोमीटरचा घाट मार्ग करण्याचे काम बाकी आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पुणे) सर्वेक्षण करून अंदाजे २३४ कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केलेला आहे.
मात्र गेले दोन दशके हा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, महामानव डॉ. बाबासाहेब यांची क्रांतीभूमी, तसेच दासबोध ग्रंथाचे जन्मस्थळ शिवथरघळ, पर्यटकांसाठी लोकप्रिय असलेला लक्ष्मी धबधबा, किल्ले तोरणा, किल्ले राजगड, किल्ले सिंहगड आणि सांस्कृतिक राजधानी पुणे ही महत्त्वाची पवित्र आणि पर्यटन स्थळे याच मार्गवर आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटन मार्ग म्हणून विकसित होऊ शकतो, तसेच महाड औद्योगिक वसाहतीला या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.

महाड-भोर मार्ग हा अत्यंत खराब, अरूंद आणि धोकादायक झाला आहे. या मार्गावर सतत दरडी आणि मोठमोठे दगड कोसळत आहे. या मार्गाचे देखील रूंदीकरण केले जावे, अशी मागणी देखील सुळे यांनी या पत्राद्वारे केली आहे. महाड-मढेघाट-पुणे या मार्गासाठी महाड उत्पादक संघटना, महाड व्यापारी संघटना, महाड आणि वेल्हे तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, तसेच कर्णवडी, केळद ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. दळणवळणासाठी फायदेशीर ठरणार्‍या या मार्गामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही प्रवासाच्यादृष्टीने हा मार्ग फायद्याचा ठरेल.

                                                                                                वार्ताहर – नीलेश पवार


हे ही वाचा – अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३६५ कोटी मंजूर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय