घरताज्या घडामोडीसावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची पोलादपूरकरांची मागणी

सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची पोलादपूरकरांची मागणी

Subscribe

२००५ साली आलेल्या महापुरानंतर आजवर या नदीच्या पात्रातील गाळ काढण्यात आलेला नाही.

पश्चिम घाटातून कोकणात उतरलेल्या आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून वाहणार्‍या सावित्री नदीच्या खोर्‍यात पोलादपूर जवळ प्रचंड गाळ साचला आहे. हा गाळ बाहेर काढण्यात न आल्यास तो अनेकांच्या जिवावर बेतू शकतो, हे लक्षात घेऊन हा गाळ तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी पोलादपूरच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. महाबळेश्वर येथून कोकणातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत डोंगररांगांमधून सावित्री नदी उंच भागातून वाहत येते. तिला ठिकठिकाणी ढवळीकामथी घोडवणी या नद्या मिळतात. या नद्यांमधून वाहत आलेला गाळ तसेच सावित्री नदीच्या प्रवाहातील गाळ वाहून खाली सखल भागात येतो. चोळई नदीच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ पोलादपूर शहराच्या सीमेवर जमा होतो. या गाळामुळे सावित्री नदीचे पात्र दगडधोंडे, मातीने भरून गेले आहे.

२००५ साली आलेल्या महापुरानंतर आजवर या नदीच्या पात्रातील गाळ काढण्यात आलेला नाही. गंगामाता घाटासमोर उंबराची फुगी, तालुका मराठी शाळा, हत्ती महाल(चित्रे घाट) बेडकीचा तलाव तसेच लेप्रसी मिशनजवळ दगडधोंडे मातीने डोह भरून गेले आहे. यामुळे नदीचे पात्र उथळ झाले असून, चरई पूल आणि स्मशानभूमीजवळ वाळू आणि मातीचा गाळ मोठ्याप्रमाणात जमा झाला आहे. येथे सावित्री नदीचे पात्र हे सखल भागात असल्याने पोलादपूर शहराच्या नदीकाठाच्या शिवाजीनगर, सिध्देश्वरआळी, बाजारपेठ व भैरवनाथ नगराच्या काही भागाला दरवर्षी धोका निर्माण होतो. मात्र याकडे पोलादपूर नगरपंचायतीने पूर्ण दुर्लक्ष केले असल्याने या गावातील रहिवाशांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागतात. यामुळेच नगरपंचायतीने सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

२००५ साली सावित्री नदीला महापूर आला होता. त्या काळात सावित्री नदीतील गाळ काढला असता तर २३ जूलै २o२१ चे पुराचे संकट आले नसते. आता तरी नगरपंचायतीने ही समस्या गांभीर्याने घ्यावी, जेणेकरून पूर नियंत्रण होऊ शकेल.अशी पोलादपूरमधील विद्यामंदीरचे अध्यक्ष श्रीनिवास शेठ यांची मागणी आहे.

– बबन शेलार

- Advertisement -

हे ही वाचा – LPG सिलेंडर आजपासून होणार महाग; जाणून घ्या नवे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -