घरताज्या घडामोडीशिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ‘डिजिटल ’

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ‘डिजिटल ’

Subscribe

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठाचा पर्याय

शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यावेळी वेगळ्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता आहे, शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करत असते; पण यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्य सरकारने नवरात्र उत्सवातील दांडिया, गरबा यावर बंदी घातल्याने राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा घेता येणार नसल्याचे सेनेच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. अर्थात डिजिटल व्यासपीठावरून यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचा पर्याय शिवसेनेला खुला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून हजारो शिवसैनिक येत असतात, त्यामुळे शिवाजी पार्क तुडूंब भरते. मात्र, यंदा देशासह राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत दसरा मेळावा घेऊन सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात बिलकूल घालणार नाही. आधीच देशाच्या तुलनेत महाराष्ट्र्रात कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेना याबाबतीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच यंदा हा मेळावा डिजिटल व्यासपीठावर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरपर्यंत कोरोनासंबंधी परिस्थितीचा आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर पक्ष प्रमुख या मेळाव्याच्या आयोजनाबाबत पुढील निर्णय घेणार आहेत.

- Advertisement -

ठाकरे कुटुंबिय आणि शिवाजी पार्क….

ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्कशी जवळचा संबंध आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा २७ नोव्हेंबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता. तेव्हापासून आजतागायत याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आलेला आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले आणि नातू आदित्य ठाकरे यांना सेनेची जबाबदारी दिली, त्याचे हे मैदानही साक्षीदार आहे. त्याच बरोबर १९९५ मध्ये जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला तेव्हा त्यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील त्यांनीही याच मैदानात शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

२०१५ साली एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या मैदानात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देण्याचा आदेश दिला. या सभांमुळे येथे ध्वनिप्रदूषण होते आणि हा परिसर शांतता क्षेत्रात येतो, असा युक्तिवाद करण्यात आला. तेव्हा शिवसेनेकडून या सभेत ६० डिग्रीपेक्षा अधिक आवाज केला जाणार नाही, त्यावेळी उच्च न्यायालयाने यंदाच्या वर्षी सभा घ्या.

- Advertisement -

मात्र, पुढच्या वर्षी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. मात्र राज्यात युतीचे सरकार होते, त्यामुळे दसरा मेळाव्याला राजकीय सभेऐवजी सांस्कृतिक स्वरूप देण्यात आले. ठाकरे कुटुंबाच्या आनंदाचे हे मैदान जसे साक्षीदार बनले, तसे २०१२ साली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुःखाचेही साक्षीदार बनले होते. त्यामुळे शिवाजी पार्क आणि ठाकरे कुटुंब यांचे नाते अनोखे आहे. यंदा मात्र ही परंपरा खंडित होते की शिवसेना नेतृत्व यातूनही काही पर्यायी मार्ग काढते याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -