उल्हासनगर मध्ये घनकचरा प्रकल्पाच्या जागेवरून वाद; गावकऱ्यांचा विरोध कायम

उल्हासनगर १ येथील डंपिंग ग्राउंडची मर्यादा संपली असून या डंपिंग ग्राउंडमध्ये उंच डोंगर निर्माण झाले होते. यानंतर डंपिंग ग्राउंड  उल्हासनगर ५ येथे हलविण्यात आले आहे.

Dispute over solid waste project site in Ulhasnagar; The opposition of the villagers continued
उल्हासनगर मध्ये घनकचरा प्रकल्पाच्या जागेवरून वाद; गावकऱ्यांचा विरोध कायम

राज्य सरकारने घनकचरा प्रकल्पासाठी उल्हासनगर मनपाला उसाटने गावाजवळ ३० एकरची जागा दिलेली आहे. सोमवारी या जागेचे मोजमाप व पाहणी करण्यासाठी मनपा प्रशासनाचे अधिकारी गेले असता गावकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवून तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. उल्हासनगर १ येथील डंपिंग ग्राउंडची मर्यादा संपली असून या डंपिंग ग्राउंडमध्ये उंच डोंगर निर्माण झाले होते. यानंतर डंपिंग ग्राउंड  उल्हासनगर ५ येथे हलविण्यात आले आहे. या ठिकाणी देखील समस्या कायम आहे. हवेचे प्रदूषण आणि धूर यामुळे स्थानिक नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असून डंपिंगचा कचरा  रस्त्यावर पडत असल्याने गायकवाड पाडा येथील रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे हा रस्ताही धोकादायक झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत, या संदर्भात अनेक आंदोलने देखील झाले आहेत.

डंपिंग ग्राउंडची समस्या लक्षात घेता मनपा प्रशासनाने घनकचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागाणी राज्य सरकारकडे केली होती. ही मागणी मान्य करून राज्य सरकारने अंबरनाथ तालुक्यातील उसाटने या गावाजवळ ३० एकर जागा घनकचरा प्रकल्पासाठी दिली आहे.

प्रकल्प सुरू होण्याआधीच उसाटनेच्या गावकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला होता.  त्यामुळे हा विषय आता संवेदनशील झाला आहे. मनपा उपायुक्त मदन सोंडे यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पथक पोलीस बंदोबस्तासह उसाटने प्रकल्पाच्या जागेची मोजणी व पाहणी करण्यास गेले असता स्थानिक गावकऱ्यांनी घनकचरा प्रकल्पास विरोध दर्शविला.

या प्रकल्पाच्या जागेपासून  ५० मीटर जवळच शाळा आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होईल, हा संपूर्ण ग्रामीण परिसर हाजी मलंग पट्ट्यातील असून वन्यसृष्टीने नटलेला आहे, या परिसरात हा तिसरा घनकचरा प्रकल्प प्रस्तावित असून केवळ उसाटनेच नव्हे तर इतर गावांना देखील त्रास होणार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी  करीत तीव्र आंदोलनाचा ईशारा मनपाच्या पथकाला दिला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड हे देखील यावेळी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी देखील घनकचरा प्रकल्पास विरोध दर्शवला. या संदर्भात मनपा उपायुक्त मदन सोंडे म्हणाले की गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या जागेजवळ शाळा असल्याचा मुद्दा उपस्थित केला असून तेथून अंतर सोडावे असे म्हटले आहे. या संदर्भात पूर्ण प्रकल्पाची माहिती गावकऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना पुढील बैठकीत देण्यात येईल. त्यानंतर निश्चितच काही मार्ग निघेल व प्रकल्पाला चालना मिळेल.


हेही वाचा – MPSC सदस्य नियुक्तीची फाईल सोमवारी प्राप्त – राजभवन