घर ताज्या घडामोडी Diwali 2021 : दिवाळीनिमित्त शेकडो मशालींनी रायगड उजळला

Diwali 2021 : दिवाळीनिमित्त शेकडो मशालींनी रायगड उजळला

Subscribe

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही संस्था गेले २७ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर साजरा करीत आहे. समितीतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला गडावर मशाली आणि दीप प्रज्वलन करून शिवचैतन्य सोहळा साजरा करण्यात आला. यंदाचे या उत्सवाचे १० वे वर्ष आहे.
सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करीत असताना आपले स्वराज्य निर्मितीसाठी बहुमोल ठरलेले गडकिल्ले हे अंधारात असणे योग्य नाही, हे जाणून २०१२ साली संस्थेने हा उत्सव सुरू केला. त्याला आता लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. समितीशी संलग्न असणार्‍या अनेक संस्था वेगवेगळ्या किल्ल्यांवर दिवाळीत शिवचैतन्य सोहळा साजरा करीत आहेत.

समितीचे कार्यकर्ते पहिला दिवा हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर लावून नंतर आपल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करतात. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला जेवढी वर्षे पूर्ण झाली तितक्या संख्येत मशाली लावून महाराजांना मानवंदना देण्यात येते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून कमी मावळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. नाणे दरवाज्यावरील मारुती, महादरवाजा, श्री जगदिश्वर प्रासाद, श्री शिर्काई मंदिर, श्री व्याडेश्वर मंदीर, भवानी कडा येथे विधिवत पूजन करून राज्याभिषेक शकानुसार ३४८ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

- Advertisement -

सायंकाळी मशाली घेऊन गडदेवता श्री शिर्काई देवी मंदिरापासून होळीच्या माळावरून राजसदरेपर्यंत महाराजांची थाटामाटात, जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. नंतर राजदरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच गडावरील रहिवाशांना, आलेल्या शिवभक्त परिवाराला आणि पोलीस मित्रांना समितीतर्फे दिवाळीचा फराळ वाटण्यात आला.


हे ही वाचा – Diwali 2021: तेजश्रीचा दिवाळीत स्पेशल पारंपरिक लूक


- Advertisement -

 

- Advertisment -