घरताज्या घडामोडीपुराचे असं संकट दुष्मनावरही नको - पालिका आयुक्त गणेश देशमुख

पुराचे असं संकट दुष्मनावरही नको – पालिका आयुक्त गणेश देशमुख

Subscribe

हा प्रसंग मनाला चटका लावणाराच होता.

पनवेल महानगरपालिकेच्या मदत पथकाने महाड येथील पूरग्रस्त परिस्थिती नियोजनात्मक पध्दतीने हाताळून जनजीवन पूवर्पदावर आणण्याची जबाबदारी पार पाडल्याबद्दल सतत चार दिवस महाडमध्ये तळ ठोकून कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करणारे आयुक्त गणेश देशमुख यांचे, त्यांचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचार्‍यांचे महाड नगरपरिषदेते खास कौतुक केले.

आजवरच्या उभवात इतका भीषण पूर आपण कधी पाहिला नाही. २००५च्या पुराहून महाडचा पूर खूपच भयाण असल्याचे चित्र मी पाहिले. दुष्मनावरही अशी आपत्ती कधी येऊ नये, असं आपण का म्हणतो याचं चित्र महाडमध्ये स्वच्छतेचं काम करताना पहायला मिळालं. आपल्या जिल्ह्यात आणि शेजारच्या तालुक्यात अशी घटना घडते आणि आपण स्थितस्थ असू, हे काही योग्य नाही. आपली जबाबदारी आणि मानवता दृष्टीकोनातून आपणही मदतीचे भागीदार झालो पाहिजे, शिवाय शेजारधर्माच्या दायित्वात आपण उतरलं पाहिजे, असं मला वाटलं.

- Advertisement -

पनवेल ही रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका होय. असे असताना या पालिकेने उत्तरदायित्व दाखवणे ही नैतिकता होती. म्हणूनच नगरविकास मंत्र्यांच्या सूचनेआधीच आम्ही आमची टीम रवाना केली. १३२ कर्मचार्‍यांसह जेसीबी, पोखलन, डंपर, पाणी फवारणी यंत्रणा, पाण्याचे टँकर अशी यंत्रणेसह १३२ कर्मचार्‍यांना तिथे रवाना केले. या सर्वांचे नेतृत्व आमचे उपायुक्त सचिन पवार आणि मूळ महाडचे असलेले आमचे शहर अभियंता संजय जगताप यांच्याकडे होते. त्यांनी अत्यंत महाडच्या पुरानंतर शहर स्वच्छतेचे साचेबध्द काम करत पालिकेला धन्यवाद मिळवून दिले.

महाडमध्ये काम करणारी आमची टीम ही सर्वात मोठी होती. ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेनेही स्वत:ची यंत्रणा रवाना केली. या टीमलाही आमच्या अधिकार्‍यांचे मार्गदर्शन होते. नियोजनबध्द कामामुळे पुरात प्रचंड घाणीचे साम्राज्ज बनलेले महाड लवकर स्वच्छ होऊ शकले. आमची मदत पाठवताना कशाची आवश्यकता आहे, याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घेतली. त्यांनी स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिलं. प्रचंड चिखलाने भरलेल्या महाडला यातून बाहेर काढणे हे जिकरीचेच होते. एकीकडे आमचे ठरत असताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यांनीही महाडला काय मदत करता येईल, याविषयी विचारणा केली. यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ही जबाबदारी येऊन पडल्यावर महापौर कविता चौतमोल आणि विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्नाला शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

साहित्य पाठवले की ते पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले, इतकेच समधान साहित्य देणार्‍यांचे असते. प्रत्यक्षात या साहित्याचा विनियोग काय झाला, हे त्याला कळत नाही. आम्हाला महाडकरांची गरज लक्षात आली. सफाई कामगार, फॉगिंग मशीन्स, स्प्रेमशीन्स, पाण्याची फवारणी अशा अतिरिक्त यंत्रणा मागवल्या. आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वानुभव यासाठी खूप कामी आला. घनकचरा विभागाचा खास चमू तिथे रवाना केला. तो इतका कामी आला की स्थानिकांनीही त्यांना मदत केली.
एमजी रोडवरील पाणी ओसरल्यावर दुसर्‍या दिवशी बाजारपेठेतल्या दुकानातील सामान बाहेर काढणार्‍या तीन-चार वर्षांच्या मुलांचे कोवळे हात आपल्या आई-वडिलांना करत असलेली मदत पहावत नव्हती. ही आपत्ती म्हणजे त्यांच्या खेळण्याच्या बागडण्याच्या वयावर केलेला अन्यायच म्हणता येईल. हा प्रसंग मनाला चटका लावणाराच होता.

आता महाडकरांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे. खरं तर सरकार पूर्णत: सकारात्मक आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची धडपड कमालीची होती. लहान वयातही त्या ज्या जिकरीने संकटाला तोंड देत होत्या, त्यांना सलामच केला पाहिजे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड सावरण्यासाठी घेतलेली मेहनत, इतर महानगरपालिकांकडून महाडकरांसाठी सहकार्य हे शिंदे साहेबांनाच उमजू शकते. जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि त्यांची टीम, महसूल विभागातील महाडचे तहसिलदार आसोत वा त्यांचे तलाठी वा ग्रामसेवक या सर्वांच्या कामाची करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे. या सर्वांच्या मेहनतीने महाड लवकर उभे राहत असल्याचे समाधान आहे.


हेही वाचा – संसदेत खासदारांच्या मौनातून भाजपचा पर्दाफाश, अशोक चव्हाण यांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -