घरताज्या घडामोडीअलिबाग : मासेमारेवरील बंदी उठल्यानंतरही मच्छिमार नौका बंदच

अलिबाग : मासेमारेवरील बंदी उठल्यानंतरही मच्छिमार नौका बंदच

Subscribe

मच्छीमारांनी बोटी समुद्रात मासेमारीसाठी नेवू नयेत असा इशाराही मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

गेल्या दोन वर्षात विविध संकटाच्या गर्तेत अडकलेला मच्छिमार बांधवांच्या मागील दृष्टचक्र कमी होण्याचे नावच घेत नाही. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून उठवलेल्या खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदीनंतर देखील खराब हवामानामुळे मासेमारी बंदच ठेवावी लागली आहे. त्यामुळे अजूनही मच्छीमार बोटी किनार्‍यावरच नांगरुन ठेवण्यात आलेल्या आहेत. खराब हवामानामुळे मच्छीमारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे तर बाजारात आवक कमी असल्याने मासळीचे दरही चढेच असल्याचे पहायला मिळाले.
मागील आठवडयात रायगड जिल्हयात अतिवृष्टी झाली. तेव्हापासून बदललेले वातावरण अजूनही स्थिरस्थावर झालेले नाही. कोकण किनारपटटीवर जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस कमी असला तरी वार्‍याचा वेग जास्त आहे. त्यामुळे समुद्रात लाटा उसळत आहेत. मच्छीमारांनी बोटी समुद्रात मासेमारीसाठी नेवू नयेत असा इशाराही मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. सर्व प्रतिकूल परिस्थिती पाहता मच्छीमार आपल्या बोटी मासेमारीसाठी पाठवण्यास राजी नाहीत.
शासनाच्या नियमानुसार गेले दोन महिने मासेमारी पूर्णपणे ठप्प होती. त्याआधी कोरोना आणि मासळीच्या दुष्काळामुळे मच्छीमार आधीच हैराण आहेत. आता निसर्गाने पुन्हा एकदा ऐन हंगाम सुरू होण्याच्या मोक्यावरच दगा दिला आहे. त्यामुळे आता केवळ किनार्‍याजवळच छोटया होडयांच्या सहायाने मासेमारी केली जात आहे. त्यात कोळंबी, बोंबील, मांदेली अशी छोटी मासळी जाळयात सापडते आहे. मासळीची आवकच कमी असल्याने ही छोटी मासळीदेखील भाव खाताना दिसते आहे.
रायगड जिल्हयात ३ हजार ४४४ यांत्रिक तर १ हजार ४९९ बिगर यांत्रिकी बोटी आहेत. त्या अजूनही किनार्‍यावरच आहेत. त्यामुळे मच्छीमार जेटींवरील नेहमीची वर्दळ अजून पहायला मिळत नाही. जेटीवर शुकशुकाट पहायला मिळतो आहे. या खराब हवामानामुळे मच्छीमारांना बोटी समुद्रात पाठवण्यासाठी आणखी ८ ते दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
खराब हवामान आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशा पदधतीचा इशारा देणारे बावटेदेखील लावण्यात आले आहेत. पुढील काही दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी जावू नये अशा सूचना देखील सर्व सोसायटयांना देण्यात आल्या आहेत,असे मत्सव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त सुरेश भारती याचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -