eid ul adha 2021: बकरी ईद केव्हापासून साजरी करण्यास सुरुवात झाली? जाणून घ्या या सणाचा इतिहास

eid ul adha 2021 When did the celebration of bakra eid do you know this history
eid ul adha 2021: बकरी ईद केव्हापासून साजरी करण्यास सुरुवात झाली? जाणून घ्या या सणाचा इतिहास

यंदाही कोरोनाच्या सावटाखाली बकरी ईद साजरी केली जातेय. ईद-उल अजहा म्हणजेच बकरी ईद सण. ईद-उल फितरनंतर मुस्लिम बांधवांचा दुसरा सर्वात मोठा सण बकरी ईद आहे. या दिवशी ईदगाह किंवा मशिदींमध्ये नमाज पठण केले जाते. ईद-उल फितर सणाच्या दिवशी जशी खीर बनवण्याची प्रथा आहे, तशी बकरी ईदच्या दिवशी बकरीचा बळी देण्याची प्रथा आहे. आज बकरी ईद निमित्ताने आपण यादिवशी बकरीचा बळी देण्याचा नेमका काय इतिहास आहे? बकरी ईद सण केव्हा आणि कसा सुरू झाला? ते जाणून घेऊयात

बकरी ईदच्या निमित्ताने उजव्या विचारसरणीशी संबंधित असलेले काही लोकं आणि नेत्यांनी गेल्या वर्षी बळी न देण्याची मागणी केली होती. दरम्यान ज्या भागात बळी देण्यासाठी जागा नसते, तिथे एक जागा निश्चित केली जाते आणि मग तिथे मोठ्या संख्येने लोकं आपल्या बकरीची बळी देतात. पण कोरोना असल्यामुळे या ठिकाणांवर बंदी घातली आहे.

इस्लाम धर्मानुसार शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद होते. हजरत मोहम्मद यांच्या काळात इस्लामने पूर्ण रुप धारण केले आणि आज मुस्लिम लोकं ज्या काही परंपरा किंवा पद्धती अवलंबतात त्या पैगंबर मोहम्मद यांच्या काळातील आहे. परंतु पैगंबर मोहम्मद यांच्यापूर्वी मोठ्या संख्येने पैगंबर आले आणि त्यांनी इस्लामचा प्रचार-प्रसार केला. एकूण १ लाख २४ हजार पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम एक होते. यांच्याच काळापासून बळी देण्याचा प्रकार सुरू झाला.

बकरी बळी देण्याची परंपरा अशी झाली सुरू 

हजरत इब्राहिम वयाच्या ८०व्या वर्षी वडील झाले. त्यांच्या मुलाचं नाव इस्माइल होते. हजरत इब्राहिम आपल्या मुलावर खूप प्रेम करत होते. एके दिवशी हजरत इब्राहिम यांना आपली सर्वात आवडत्या गोष्टीचा बळी किंवा त्याग करा असे स्वप्न पडले. इस्लामी तज्ज्ञ म्हणतात की, अल्लाहचा हा आदेश होता आणि हजरत इब्राहिम यांनी आपल्या लाडक्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर हजरत इब्राहिम यांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला. परंतु इस्माइलच्या जागी एक बकरा तिथे प्रकट झाला. जेव्हा हजरत इब्राहिम यांनी डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्माइल सुखरुप उभा होता आणि बकऱ्याचा बळी गेल्याचे दिसले. असे म्हटले जाते की, ही एक परीक्षा होती आणि हजरत इब्राहिम त्यामध्ये यशस्वी झाले. अशाप्रकारे बकरी बळी देण्याची परंपरा सुरू झाली.

हजरत इब्राहिम यांच्या काळात बळी देण्याचा प्रकार सुरू झाला परंतु बकरी ईद आजच्या काळात ज्याप्रकारे साजरी केली जाते, तशी त्यांच्या काळात केली जात नव्हती. आज ज्याप्रकारे मशिद किंवा ईदगाहवर जाऊन नमाज पठन केले जाते असे हजरत इब्राहिम यांच्या काळात केले जात नव्हते. ईदगाहमध्ये जाऊन नमाज पठन करण्याची परंपरा पैगंबर मोहम्मद यांच्या काळात सुरू झाली. याबाबत इस्लामी तज्ज्ञ मौलाना हामिद नौमानी यांनी सांगितले की, ‘हजरत इब्राहिम यांच्या काळात बळी देण्यास सुरुवात झाली होती. परंतु ईदगाहमध्ये नमाज पठन करण्याची परंपरा पैगंबर मोहम्मद यांच्या काळातील आहे.’

नमाज पठन करण्यासाठी ईदगाहमध्ये का जाता? याचे उत्तर देताना मौलाना नोमानी यांनी सांगितले की, ‘मशिद किंवा ईदगाह या दोन्ही ठिकाणी नमाज पठन करू शकतात. परंतु ईदगाहमध्ये नमाज पठन करणे चांगले मानले जाते. कारण लोकांना समजायला पाहिजे, त्यांची संस्कृती काय आहे? ते कोण आहेत?’

कोणत्याही परिसरात किंवा शहरात मशिदीची संख्या खूप जास्त आहेत. परंतु एखाद्या भागात किंवा शहरात एकच ईदगाह असते. जिथे आजूबाजूचे सर्व लोकं एकत्र येतात आणि नमाज पठन करतात. ईदगाहमध्ये नमाज पठन करण्याव्यतिरिक्त एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देण्याची परंपरा आहे.