घरताज्या घडामोडीरायगड पर्यटनाला कल्पकतेची गरज..

रायगड पर्यटनाला कल्पकतेची गरज..

Subscribe

काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या तेव्हा पर्यटकांची पावलं समुद्र पर्यटनाकडे वळली.

ऐतिहासिक, धार्मिक स्थळासोबत नैसर्गिक सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण ही रायगड जिल्ह्याची खरी श्रीमंती! छत्रपती शिवरायांच्या आवडत्या रायगड किल्ल्यासोबत छोटे-मोठे ऐतिहासिक किल्ले, जलदुर्ग, तर दुसरीकडे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र हरिहरेश्वर, अष्टविनायकांपैकी पाली येथील श्री बल्लाळेश्वर आणि महड येथील श्री वरद विनायकाचं मंदिर, श्री क्षेत्र कनकेश्वर, चौलचं श्री दत्त मंदिर, साळावचं बिर्ला मंदिर यासह अनेक इतिहासकालीन मंदिरं या जिल्ह्यात आहेत. जवळपास दीडशे किलोमीटर लांबीचा अरबी समुद्र, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड अभयारण्य इथे आहे. कै. विनोबा भावे, कै. सी. डी. देशमुख, यांच्यासह थोर निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची ही भूमी! असं सारं वैभव असताना मोठ्या प्रमाणात झालेलं औद्योगिकीकरण ही सुद्धा रायगड जिल्ह्याची मोठी ओळख आहे.

काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या तेव्हा पर्यटकांची पावलं समुद्र पर्यटनाकडे वळली. त्यामुळे रायगडपासून गोव्यापर्यंत पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला. रायगड जिल्हा दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने गेल्या १५ वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली. रस्ते, रेल्वे, जलमार्ग जा-ये करण्यासाठी आहेत. कोविडचा काळ वगळला तर एरव्ही पर्यटकांची कायम वर्दळ जिल्हाभर असते. रायगडचा निसर्ग अनुभवत असताना पर्यटकांना ऐतिहासिक स्थळंही अनुभवता येतात आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक पर्यटनही होतं. रायगड किल्ला, विविध धार्मिक ठिकाणं, माथेरान गिरिस्थान याशिवाय श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारे या ठिकाणी गर्दी असते. याशिवाय लेण्या पाहण्यासही पर्यटक दुरून येतात. रायगडमधील पर्यटनाचा बोलबाला सुरू असताना स्थानिक प्रशासन किंवा राज्य शासन यापैकी कुणाकडूनही पर्यटन वृद्धीसाठी फारशी कल्पकता दाखविता आलेली नाही. कधीतरी निधी आला म्हणजे पर्यटनाला चालना मिळाली असं नव्हे. सुसज्ज रस्ते, जेवण आणि राहण्याची उत्तम सुविधा, पाणी पुरवठा, प्रसाधनगृहं, मोबाईल नेटवर्कची सुविधा, सुरळीत वीज पुरवठा, सुरक्षा व्यवस्था अशा साऱ्या आघाड्यांवर राज्यातच आनंद आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेकदा पर्यटकांचा वेळ प्रवासात जातो. काही ठिकाणी राहण्याची सोय नाही, जेथे ती आहे त्यापैकी अनेक ठिकाणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतच नाहीत. यामुळेच परिणामी मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी जिल्ह्याचं पर्यटन महागडं ठरतं.

- Advertisement -

बहुतांश ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे आहे. एखादवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर स्थानिकांना त्यात हस्तक्षेप करावा लागतो. बेताल वागणाऱ्या या मूठभर पर्यटकांचा त्रास कित्येकदा इतर पर्यटकांना तर होतोच, शिवाय स्थानिकांनाही डोकेदुखी होते. यातून पर्यटक आणि स्थानिक असा टोकाचा वादही होत असतो. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कोणतीही विशेष अशी पावलं उचलली गेली नाहीत. ज्यांना जमेल तसे छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. यात काहीसा विस्कळीतपणा असल्याने बाहेरून आलेले व्यावसायिक काही ठिकाणी बस्तान मांडून बसले आहेत. याकरिता स्थानिक बेरोजगार तरुण, महिला बचत गट यांना पुरेसं अर्थ पाठबळ देणं गरजेचं आहे. दुर्दैवाने यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. पर्यटन विकास निधी आला की उत्सवाबरोबर विषय संपून जातो. या निधीचा योग्य वापर होतोय किंवा नाही हे पाहण्याची तसदी घेतली जात नाही. रायगड किल्ल्यावर रोप वेची सुविधा आहे. परंतु ती वाढत्या गर्दीला अपुरी ठरत असल्याने त्यात वाढ केली पाहिजे. शिवाय माथेरानसाठी रोप वेची चर्चा आहे. त्या ठिकाणी रोप वेची सुविधा निर्माण केली तर माथेरानचं पर्यटन अधिक सोपं होण्यास मदत होईल. माथेरानला पर्यावरण विषयक नियमांचं काटेकोर पालन करावं लागत असल्याने मिनी ट्रेन, घोडे आणि हातरिक्षा हीच प्रवासाची साधनं आहेत. ई रिक्षा किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय तेथे उपलब्ध झाला तर ते पर्यटकांसाठी सुखदायी ठरू शकेल. मुंबई-मांडवा रो-रो सेवेप्रमाणे लवकरच काशीद-मुंबई रो-रो सेवा सुरू होईल. यामुळे मुरुड तालुक्याचं पर्यटन अधिकच बहरेल. यासाठी तिथे योग्य त्या मूलभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील. मुरुडप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यातील अंतर्गत रस्ते प्राधान्याने प्रशस्त झाले तर पर्यटकांना पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता येईल. रायगड किल्ला संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. असेच उपक्रम जिल्ह्यातील अन्य किल्ल्यांसाठी राबविण्याची गरज आहे. कारण हा ऐतिहासिक ठेवा आहे.

अलिकडच्या काही वर्षांत जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. कोरोनामुळे निर्बंध असले तरी धबधबे, धरणे या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. बंदी असलेल्या ठिकाणीही पर्यटक आडमार्गाने पोहचत आहेत. नव्याने येणारे पर्यटक धडपणे माहिती नसताना पाण्यात उतरण्याचं धाडस करतात. त्यातून अपघाती घडना घडून काहींना प्राणाला मुकावं लागलं आहे. खरं तर अशा ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करून पर्यटकांना आनंद घेऊ द्या, ही मागणी अनेकदा झाली आहे. मात्र स्थानिक प्रशासन धाडकन बंदीची कारवाई करून मोकळं होतं. परंतु पर्यटक येण्याचं काही थांबत नाहीत. पावसाळी पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतो. जी ठिकाणं खरोखरच धोकादायक आहेत तिथे बंदी असलीच पाहिजे. परंतु जिथे धोका नाही, तिथे सरसकट बंदी कशासाठी? याचं उत्तर मिळत नाही.

- Advertisement -

धबधब्यांचा आनंद पावसाळ्यातच लुटता येत असल्याने आलेल्यांना, हौशी पर्यटकांना दुर्गम ठिकाणी असलेल्या धबधब्यांकडे जाण्यासाठी खूप त्रास होत असतो. यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करून गाईड म्हणून नेमलं तर ते सर्वच दृष्टीने सोयीस्कर ठरू शकतं. फणसाड अभयारण्यात असा प्रयोग केला जाणार असून, ही समाधानकारक बाब आहे. पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिकांनी छोटी दुकाने थाटली आहेत. तिथे गरम जेवण, शिवाय चहा, मक्याची कणसं, भुईमुगाच्या शेंगा आणि इतर खाद्यपदार्थ मिळण्याची सुविधा उपलब्ध असते. सरसकट बंदीमुळे हे व्यवसाय ठप्प झाले आहेत. पर्यटन वृद्धीच्या गोष्टी करायच्या, प्रत्यक्षात बंदी, नियमात सर्वांना अडकवणं कितपत योग्य आहे? याचा विचार संबंधितांनी करायला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी काशीद पूल कोसळण्याची घटना घडली. मुरुडकडे जाणाऱ्या या मुख्य मार्गावरील हा पूल पुराच्या लोंढ्यात वाहून गेला. यामुळे मुरुडहून अलिबागकडे किंवा तेथून इकडे येणाऱ्यांना द्राविडी प्राणायम करीत भालगाव मार्गे जा-ये करावी लागली. आलेले पर्यटकही अडकले. प्रमुख मार्गावरील पूल असे जर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार असतील तर ते पर्यटन वृद्धीसाठी नक्कीच योग्य नाही. वाहतूक वाढली तरी जुने पूल तसेच आहेत. कधीतरी स्ट्रक्चरल ऑडिट होते असं म्हणतात. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळतेच, शिवाय शासकीय तिजोरीलाही विविध करांद्वारे हातभार लागतो. काही राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. इथे निसर्गाने भरभरून दिलं असताना कधीतरीच सोयीसुविधांसाठी त्याकडे लक्ष दिले जातं, हे योग्य नाही.

जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये काही ना काही तरी पाहण्यासारखं आहे. पावसाळी पर्यटन असो वा इतर वेळचं पर्यटन असो, रायगड जिल्हा आणि पर्यटकांची गर्दी हे समीकरण घट्ट झालं आहे. देश-विदेशातील पर्यटक या जिल्ह्यात येतात. त्यांना उत्तमोत्तम सुविधा देताना सर्वसामान्य पर्यटकांनाही पर्यटनाचा आनंद लुटता यावा, त्यांना पर्यटनस्थळी राहता यावं, याकरिताही जाणीवपूर्वक सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. मूलभूत सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या असतील तर पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्यास मदत होईल. रोह्याच्या कुंडलिका तिरावर नदी संवर्धानाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला आहे. तसे उपक्रम जागोजागी वेगवेगळी कल्पकता दाखवून राबविले गेले तर स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी तर येईलच, शिवाय बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी प्राप्त होतील.

मनोरंजनाच्या सुविधा जिल्ह्याच्या काही भागांत उपलब्ध आहेत. पण तेथील थाटमाट सर्वसामान्यांना परवडणारा नाही. कर्जतसारख्या भागात कृषी पर्यटनाची संकल्पना यशस्वी ठरली आहे. तोच प्रयोग इतरत्र झाला आणि त्यासाठी शासनाकडून आर्थिक हातभार लावला गेला तर शेतीची आवड असणारे तरुण यात पुढे येतील. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक कारखानदारी असल्याने हवेच्या प्रदुषणाचा धोका निर्माण झालेला आहे. नद्याही प्रदुषित होत आहेत. पर्यावरणाला चालना देताना कमीत कमी प्रदूषण होण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं लागेल. महाडकडून मुरुडकडे जाताना धाटावचं प्रदूषित वातावरण अनुभवावं लागत असेल किंवा हाच प्रकार पेणहून अलिबागकडे जाताना अनुभवयास येणार असेल तर ते योग्य ठरणार नाही. अतिशय सुनियोजित पद्धतीने रायगडच्या पर्यटनाचा विकास केला गेला तर ते कधीही योग्यच ठरेल!

                                                                                                                        -उदय भिसे


हेही वाचा – शहरासमोरील आव्हानांसह गरजांचे प्रतिबिंब महानगरमध्ये दिसावे – आमदार प्रशांत ठाकूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -