दिलासा : एकल बालकांसह आता एकल महिलांनाही मिळणार आर्थिक मदत, पनवेल महापालिकेचा निर्णय

आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे घेण्यात आला आहे.

Financial assistance from PMC to those who lost their parents due to corona
दिलासा : एकल बालकांसह आता एकल महिलांनाही मिळणार आर्थिक मदत, पनवेल महापालिकेचा निर्णय

कोरोना काळात अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे घेण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहेत, अशा एकल महिलांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या आज शुक्रवारी, १ ऑक्टोबरला झालेल्या ऑनलाईन बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. पनेवल महानगरपालिकेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण विभागाने दोन महत्त्वाच्या विषयास मान्यता दिली आहे.

याचबरोबर पती निधनानंतर एकल महिलांना ‘विधवा’ म्हणून संबोधले जाते. अशा शब्दातून त्यांचा अवमान व उपेक्षा केली जाते. म्हणून यापुढे विधवा असा शब्दप्रयोग न करता ‘विवाहित एकल महिला’ असे संबोधण्यात यावे, असा ठराव यावेळी करण्यात आला. दिनांक १२ मार्च २०२० नंतर कोविड-१९ या संसर्गामुळे ज्या बालकांचे एक पालक मृत्यू पावले आहेत. अशा बालकांना २५ हजार रुपये तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. तसेच करोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पती निधन पावले आहेत अशा ‘एकल’ महिलांना ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे.

नियम आणि अटी लागू असणार…

यासाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. कोविडमुळे मयत झालेल्या एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यूच्या वेळी कोविड तपासणी अहवाल पॉझीटिव्ह असणे गरजेचे आहे. कोविड १९मुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून उपचार घेवून परतल्यानंतर पुन:श्च कोविड उपचाराकरिता रूग्णालयात दाखल असताना कोविड संसर्गामुळे मृत्यू झाला असल्यास त्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते. म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळू शकते. यासाठी स्वतः मुले, त्यांचे संगोपन करणारे सध्याचे पालक किंवा संगोपन करणारी संस्था अर्ज करू शकेल. या अंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य हे लाभार्थी बालकांच्या नावने मुदत ठेवीच्या स्वरूपात असेल.


हे ही वाचा – OBC समाजाने आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल