आगीचे सत्र सुरुच; तळोजा MIDCत रासायनिक कारखान्याला आग

तळोजा एमआयडीसीत असलेल्या एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

fire breaks out

गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वीच ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चरईत एका इमारतीच्या मीटर रुमला आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याचे समोर आले आहे. तळोजा एमआयडीसीत असलेल्या एका रासायनिक कारखान्याला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्फोटाच्या आवाजाने तळोजा हादारले

तळोजा एमआयडीसीत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. भूखंड ३४च्या जवळ अॅजो प्लास्ट नावाचा एक रासायनिक कारखाना आहे. या कारखान्याला अचानक भीषण आग लागली. हा रासायनिक कारखाना असल्याने यातून मोठमोठे स्फोटाचे आवाज येत असल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या कारखान्यात ४ ते ५ जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या आगीने घेतलेले रौद्र रुप पाहून ही आग इतर कारखान्यांपर्यंत पोहचू शकते, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. तसेच या आगीची झळ शेजारच्या कारखान्यांना देखील बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा – कल्याण, ठाण्यात ७५०० घरांची म्हाडाची लॉटरी