शहापुरातील धान्याचे व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर आज रात्री आठच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार हल्लेखोर फरार झाले असून शहरातील गंगारोड भागातील राईसमिल बाहेर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान रमेश अग्रवाल यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी ठाणे शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रमेश अग्रवाल (५९) शहापूर शहरातील गंगारोड भागातील राईसमिल बाहेर दुचाकीवरून घराकडे निघण्याच्या तयारीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान हल्ल्यामागचे नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा – खेळायला घेतली आगपेटी अन् अख्खा बेड झाला खाक; आगीच्या धुरातून दोन आजीबाईंची सुखरूप सुटका