दुःखद घटना: Coronavirus मुळे मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदाराचा मृत्यू

Police constable surekha mahadik
सुरेखा महाडीक (सुरेखा उनावकर)

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दिवस रात्र ड्युटी करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनाही कोरोनाने घेरलेले आहे. आतापर्यंत पोलीस दलातील शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र पहिल्यांदाच एका महिला पोलीस शिपायाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई सुरेखा उनावकर (सुरेखा महाडिक) यांचे रविवारी कल्याण येथील रुग्णालयात निधन झाले. त्या ४३ वर्षांच्या होत्या. मुंबई पोलीस दलात त्यांनी २० वर्षांची सेवा पुर्ण केली होती. उनावकर यांच्या निधनाने मुंबईतील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा ८६ वर पोहोचला असून राज्यात एकूण २६१ पोलीस कोरोनाचे बळी ठरले आहेत.

उनावकर यांना दुसरा कोणताही मोठा आजार नव्हता. सप्टेंबर महिन्यात त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ लागल्यामुळे कल्याण येथील वैद्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २८ सप्टेंबर रोजी त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर शनिवारी याच रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. उनावकर यांच्या पश्चात त्यांचे पती कुटुंबात आहेत. उनावकर मुळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील असून त्या पतीसोबत कल्याण येथे राहत होत्या. सन २००१ साली मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या पोलीस शिपाई सुरेखा महाडिक या विशेष शाखा – २ (एसबी – २) येथे कर्तव्याला होत्या.

सुरेखा यांच्या सहकाऱ्यांना त्यांची मृत्यूची बातमी कळल्यानंतर धक्काच बसला. आपला जन्मदिना साजरा केल्याच्या तीन दिवसानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उनावकर या महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या चौथ्या महिला आहेत. तर ठाण्यात पहिल्यांदाच महिला पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याआधी चंद्रपूर आणि नागपूर पोलीस दलातील महिला शिपायांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

महिला पोलिस सुरेखा उनावकर
महिला पोलिस सुरेखा उनावकर

मुंबईत ६६ वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

कोविद योद्ध्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे. काहींनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयातील ६६ वर्षीय डॉक्टर नरेंद्र रेगे यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मागच्या २२ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र कोरोनाने त्यांचे अवयव निकामी केल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. १५ सप्टेंबर रोजी रेगे यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी देखील करण्यात आली होती. मात्र त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही, अशी माहिती डॉ. जी.जे. लालमलानी यांनी दिली.