घरक्राइमउरण तालुक्यातील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला

उरण तालुक्यातील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Subscribe

उरण तालुक्यातील न्हावे गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्यावर मंगळवारी रात्री काही गावगुंडांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, उलवा नोडमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोर फरार झाले असून, न्हावा शेवा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास म्हात्रे लग्न समारंभाला हजेरी लावून आपल्या गाडीतून घरी जात असताना अगोदरच दबा धरून बसलेल्या विक्रांत भोईर आणि त्याच्या दोन साथीदारांनी म्हात्रे यांच्या गाडीवर जोरदार हल्ला करून काचा फोडल्या. या अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळून गेलेले म्हात्रे गाडीतून बाहेर येताच भोईर याने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. मात्र सावध असलेल्या म्हात्रे यांनी लोखंडी रॉडचा प्रहार हातावर घेतल्याने हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

म्हात्रे यांच्या मदतीला आजूबाजूचे नागरिक जमा होताच आरोपी पळून गेले. न्हावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्किंगला म्हात्रे सरपंच असताना विरोध केला होता. या बेकायदेशीर पार्किंगच्या वसुलीतून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बंद झाल्याचा राग मनात ठेवून भोईर आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. न्हावा शेवा पोलिसांनी आरोपी विक्रांत जयवंत भोईर (३५), राकेश आत्माराम पाटील (३५) आणि गौतम जनार्दन गायकवाड (३२) यांच्यावर भादंवि ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या फरार आरोपींचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -