पूर परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी रायगडात बांबूच्या बेटांची निर्मिती

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होते.

four lakh bamboos planted in raigad to prevent soil erosion
पूर परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी रायगडात बांबूच्या बेटांची निर्मिती

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. पुराच्या पाण्यामुळे माती वाहून जाऊन जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. जमिनीची ही धूप रोखण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतर्फे ठिकठिकाणी बांबूची बेटे निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात ४ लाख बांबूची लागवड करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, महाड आणि पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बांबूची रोपे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बांबूची रोपे लावण्याचे काम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकारी मनरेगा संजय चव्हाण यांनी दिली आहे.

२२ व २३ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील नदीला पुर येऊन मोठी आर्थिक हानी झाली. पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूरनियंत्रण व संरक्षण, धुपप्रतीबांधक कामे करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बांबूच्या बेटांची निर्मिती करण्यात येणार आहे. बांबूच्या बेटांमुळे पूरपरिस्थिती जमिनीची होणारी धूप रोखली जाण्यास मदत होईल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाड, पोलादपूर या तालुक्यांमध्ये बांबू लागवडीचे काम सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात लावण्यात येणार बांबूची रोपे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणण्यात येत आहेत. ही रोपे रोजगार हमी योजनेअंतर्गत लावण्यात येत असून, यामुळे रोजगार निर्मिती होत आहे.


हे ही वाचा – महाराष्ट्र दिनी घराच्या चाव्या देणार, तळीये दरडग्रस्तांना ६०० चौ.फू. क्षेत्रफळाची घरे