चार महिन्यांच्या मुलीची ४ लाख ८० हजारांना केली विक्री; पोलिसांनी केला पर्दाफाश

तीन महिलांसह अकरा आरोपींना अटक; मुलीची सुखरुप सुटका

four month old girl abducted in mumbai

चार महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश करून व्ही.पी रोड पोलिसांनी अकरा जणांच्या एका टोळीला अटक केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. इब्राहिम अल्ताफ शेख, मोहम्मद शेरखान ऊर्फ शेरु पीरमोहम्मद खान, लक्ष्मी दिपक मुरगेश ऊर्फ कोंडर, सद्दाम अब्दुल्ला शाह, अमजद मुन्ना शेख, ताहिरा ऊर्फ रेश्मा गुलाब नबी शेख, कार्तिक राजेंद्रन, चित्रा कार्तिक, तमिळ सेल्वन थंगराज, मूर्ती पलानी सामी आणि आनंदकुमार नागराजन अशी या अकरा जणांची नावे आहेत. या मुलीची तामिळनाडू येथे चार लाख ऐंशी हजार रुपयांना विक्री झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली असून तिला सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

अन्वरी अब्दुल रशीद शेख ही महिला गिरगाव परिसरात राहत असून तिला एक चार महिन्यांची मुलगी आहे. तिचे इब्राहिमसोबत प्रेमसंबंध होते. ती त्यांच्यासोबत राहत होती. २७ डिसेंबरला ती कामावरुन निघून गेली होती. कामावरुन घरी आल्यानंतर तिला तिची चार महिन्यांची मुलगी दिसून आली नाही. त्यामुळे तिने तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. या मुलीचे इब्राहिमनेच अपहरण केल्याची खात्री होताच अन्वरीने सात दिवसांनी पोलीस ठाण्यात इब्राहिमविरुद्ध तिच्या मुलीचे अपहरण केल्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची व्ही.पी रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत इब्राहिमविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे तीन ते चार विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक माहितीसह सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने इब्राहिम शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी शीव, धारावी, जोगेश्‍वरी, नागपाडा आणि कल्याण अशा विविध ठिकाणी छापे टाकून दोन महिलांसह चार पुरुष अशा सहा जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत त्यांनी या मुलीला कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिलीप तांबे, अभिजीत देशमुख आणि अन्य पोलीस पथकाला तामिळनाडू येथे पाठविण्यात आले. या पथकाने तिथे चार ते पाच दिवस पाळत ठेवून या मुलीला सेवलानपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. याच गुन्ह्यात नंतर पोलिसांनी एका महिलेसह इतर चौघांना अटक केली होती. या सर्वांना नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

आरोपींच्या चौकशीत त्यांनी या मुलीची चार लाख ऐंशी हजार रुपयांना विक्री केल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी ४४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि पंधरा हजार रुपयांचा एक मोबाईल जप्त केला आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दरम्यान इब्राहिमने ही मुलगी त्याचीच मुलगी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे लवकरच या मुलीसह इब्राहिमची डीएनए चाचणी होणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – Malvani ISIS Case: मालवणी ISIS प्रकरणातील दोन्ही आरोपींना NIA कोर्टाने ८ वर्षांची ठोठावली शिक्षा; १० हजार भरावा लागणार दंड