घरताज्या घडामोडीमेडिकल फिल्डकडून हॉटेल मॅनेजमेंटकडे

मेडिकल फिल्डकडून हॉटेल मॅनेजमेंटकडे

Subscribe

मी प्रिती शर्मा… मेडिकल क्षेत्रातून शिक्षण घेत असताना मला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र खुणावू लागले. खरं तर मला लहानपणापासूनच कुकिंगची आवड होती त्यामुळे मी मेडिकल फिल्ड सोडून हॉटेल मॅनेजमेंटकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही अडचणी आल्या. परंतु, कोणतेही क्षेत्र निवडताना त्यात तुम्हाला मनापासून आवड असायला हवी इतकंच नव्हे तर प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारीही हवी. या गोष्टींची जर खुणगाठ मनाशी बाळगली तर मग आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. याच सूत्रानुसार मी हॉटेल मॅनेजमेंटकडे वळले. नाशिकच्या अग्रणी हॉटेलमधे चीफ शेफ म्हणून मी सध्या काम करत आहे.

मी मूळची राजस्थानची. पण मी नैनितालमधून शिक्षण पूर्ण केले. मला लहानपणापासूनच कुकिंगची प्रचंड आवड होती. मी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. इयत्ता ११ वी १२ वी मध्ये मी वैद्यकीय शाखेला प्रवेश घेतला. मात्र, नंतर मी घरच्यांना माझ्या कुकिंगच्या आवडीबददल सांगत मला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करियर करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मेडिकल फिल्ड सोडून थेट हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरकडे वळण्याच्या माझ्या निर्णयाने घरचेही थोडे अचंबित झाले. पण त्यांनी पाठिंबा दिला. मी आयएचएम जयपूरमधून हॉटेल मॅनेमेंटचे धडे घेतले. यानंतर नाशिकमध्ये सहा महिन्यांच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी आले होते. नाशिकच्या गेट वे हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. यानंतर नाशिकमध्येच मला या क्षेत्रातील चांगल्या संधी मिळत गेल्या आणि मी नाशिकलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

आज हॉटेल मॅनेमेंट या क्षेत्राकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन काहीसा वेगळा आहे. कारण मुलं जर अभ्यासात मागे असतील किंवा त्यांना कुठल्याही शाखेत प्रवेश मिळत नसेल तर, पर्याय म्हणून हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र निवडले जाते अशी एक मानसिकता तयार झाली आहे. परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. या क्षेत्रात करियर करणे हे माझे स्वप्न होते, ध्येय होते आणि मुळात कोणतेही क्षेत्र निवडताना तुम्हाला त्या क्षेत्राविषयी, तेथील कामाविषयी आवड असणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात मनापासून काम करू शकता आणि प्रगतीही. वैद्यकीय शाखेमध्ये शिक्षण घेत असताना गुणात्मकरित्या माझी टक्केवारीही चांगली होती. परंतु, तरीही हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंबिय तसेच नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अर्थात त्याला कारणेही आहेतच.

कारण आपल्याकडे आजही महिला पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात काम करत असल्या तरी, आजही महिलांच्या कामावर काही मर्यादा नाही म्हटलं तरी आहेतच. जसे की, महिला कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहून काम करू शकत नाही. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना चूल आणि मूल ही कर्तव्य देखील विसरू नये अशा मानसिकताही असतात. या गोष्टीला मलाही तोंड द्यावे लागले. हॉटेलच्या किचनमध्ये काम करणे तितकसं सोपं नसतं. हॉटेलमध्ये विविध प्रकारचे लोक येतात, बहुतांश हॉटेलमध्ये पुरुषच किचन सांभाळतात. मग अशा स्टाफ बरोबर काम कसे करू शकणार. पण जर तुम्हाला करियर करायचे असेल तर, कामाकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणजे अगदी जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना मला माझ्या प्रोफेसरने सांगितले की, या क्षेत्रात ट्रेनिंगनंतर अनेकजण हे क्षेत्र सोडून देतात. परंतु, मी याच क्षेत्रात पुढे जाण्याची खुणगाठ बांधली होती त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम होते. सुरुवातीला काहीशा अडचणी आल्या. या क्षेत्रात काम करताना तुमच्या अटी ठेवून चालत नाही जसे की, मी सायंकाळी लवकर घरी जाईन, मी हेवी कंटेनर उचलणार नाही या सर्व अटी, शर्थी बाजूला ठेवाव्या लागतात. या सर्व गोष्टी मी केल्या. कधी कधी तर त्रासही झाला.

- Advertisement -

शेफ म्हटलं की फक्त कुकिंग असा समज आहे. परंतु, तसे नाही, या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट ही जबाबदारी त्यांची असते. त्या हॉटेलची मेन्यू रचना करणे, लोकांच्या आवडी निवडी याची खबरदारी घेणे, खाद्य पदार्थांचा दर्जा तपासणे, त्यात सातत्य राखणे, स्टाफ मॅनेजमेंट, मेन्यू इंजिनिअरींग फार महत्त्वाचे असते. सर्व्हिस, हाऊसकिपिंग, रूम गेस्टचा ब्रेक फास्ट याची खबरदारी घ्यावी लागते. नवीन रेसिपी बनवणे, हॉटेलला प्रेझेंट करणे अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. या क्षेत्रात खूप संधी आहेत. हो पण कष्ट देखील तितकेच. परंतु, आपण जर आवड म्हणून जर या क्षेत्रात येऊ इच्छित असाल तरच या क्षेत्रात यावे. आज पर्यटन वाढतेय पर्यटनाबरोबर हॉटेल इंडस्ट्रिजही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे त्यामुळे या क्षेत्रात यापुढील काळात अनुभवी लोकांची प्रचंड आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणार्‍या विद्यार्थिनी असतील त्यांना मी ‘आपलं महानगर’ च्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की, हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात संधी फार आहेत. परंतु, केवळ आपण एक नोकरी म्हणून याकडे पाहत असाल तर यात फार काळ टिकू शकणार नाही याकरिता काम करण्याची आवडही हवी.

शब्दांकनमनीष कटारिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -