पनवेलमधील गाढी नदीलगत संरक्षणभिंत बांधणार !

जास्त पाऊस झाल्यानंतर शहरामध्ये पुराची भीतीसुद्धा अनेकदा निर्माण होते.

Gadhi in Panvel will build a protection wall near the river
पनवेलमधील गाढी नदीलगत संरक्षणभिंत बांधणार !

पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पनवेलकरांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यानंतर शहरामध्ये पुराची भीतीसुद्धा अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आज (मंगळवार) २७ जुलै रोजी आमदार प्रशांत ठाकूर आणि मनपाचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनांचा महापालिका प्रशासनाने स्वीकार केला. याशिवाय गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पनवेल शहरात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बी वर भराव घालून त्य ठिकाणी पूल बांधण्यात आला. तेव्हापासून पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे पनवेल शहरातील खाडीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. जास्त पाऊस झाल्यानंतर बावन बंगला, मिंडल क्लास हाउसिंग सोसायटी, लोखंडी पाडा साईनगर, सहस्रबुद्धे हॉस्पिटल आणि पटेल व कच्छी मोहल्ला, भारत नगर जुने कोर्ट याव्यतिरिक्त कोळीवाडा या ठिकाणी पाणी साचते. विशेष करून प्रभाग क्रमांक १४,१८ आणि १९ हा परिसर जलमय होतो. त्यामध्ये खांदा गावचा ही समावेश आहे. मागील आठवड्यात पडलेल्या जास्त पावसामुळे या परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे काही घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले.

वडघर याठिकाणी सिडकोने रिटेनिंग वॉल बांधली असल्याने त्याचा परिणाम सुद्धा या ठिकाणी होतो. माथेरानच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेकदा गाढी नदी पात्र भरून वाहते. त्यामधून पाणी पनवेल शहरातील विविध भागांमध्ये शिरत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन पनवेल महानगरपालिकेने यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, योग्य ते नियोजन करावे, अशा प्रकारची सूचनावजा मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. पूर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून गाठी नदीलग संरक्षण भिंत बांधण्याच्या मागणीला मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी तत्वतः मान्यता दिली. त्याचबरोबर इतर उपायोजना करण्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले.


हेही वाचा – नागरिकांचे हाल नकोत, निर्बंध शिथिल करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र