दोन कोटीच्या खंडणी प्रकरणी एजाज लकडावाला याला अटक

कल्याण येथील एका व्यापाऱ्याला २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोनवर दिलेल्या धमकी प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीचा गँगस्टर एजाज युसूफ लकडावाला याचा तळोजा तुरुंगातून ताबा घेण्यात आला आहे.

ejaz-lakdawala

कल्याण येथील एका व्यापाऱ्याला २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोनवर दिलेल्या धमकी प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीचा गँगस्टर एजाज युसूफ लकडावाला याचा तळोजा तुरुंगातून ताबा घेण्यात आला आहे. याप्रकरणात एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली असून १२फेब्रुवारी पर्यत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एजाज लकडावाला याला जानेवारी २०२०रोजी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने पाटणा विमानतळावरून अटक केली होती. त्यानंतर त्याचा मुक्काम तळोजा तुरुंगात होता.

कल्याण येथे राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला २०१९ मध्ये एजाज लकडावाला याने फोनवरून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र माझ्याकडे एवढी रक्कम नसून त्याला खंडणी देण्यास व्यापाऱ्याने नकार दिल्यानंतर एजाज लकडावाला याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी व्यापाऱ्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एजाज लकडावाला विरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात सोमवारी ठाणे खंडणी विरोधी पथकाने एजाज लकडावाला याचा ताबा तळोजा तुरुंगातून घेऊन त्याला खंडणीचा गुन्हयात अटक करण्यात आली आहे. कल्याण न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १२ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२०२० मध्ये पाटणा विमानतळावरून करण्यात आली होती अटक

मुंबई पोलिसांना अनेक गंभीर गुन्ह्यात पाहिजे असणारा कुख्यात गँगस्टर एजाज युसूफ लकडावाला हा बिहार राज्यात लपून बसला असून जानेवारी २०२०मध्ये पाटणा विमानतळावरून परदेशात पळून जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. या महितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने १९जानेवारी रोजी एजाज युसूफ लकडावाला याला पाटणा विमानतळावर अटक करून मुंबईत आणण्यात आले होते. मुंबई खंडणी विरोधी पथकाची पोलीस कोठडी संपल्यानंतर एजाज लकडावाला याची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली होती.

२००३ मध्ये लकडावाला दाऊद इब्राहिम गँगच्या हल्ल्यात मारला गेल्याची अफवा पसरली होती. मात्र लकडावाला त्या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. एजाज लकडावालाने छोटा राजनसोबत हातमिळवणी केली होती या संशयावरून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा नाराज होता. दाऊदच्या सांगण्यावरून एजाज लकडावाला याच्या त्यांच्यावर हल्ला केला होता. जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर लकडावाला बँकॉकहून कॅनडाला पळून गेला होता. त्यानंतर अनेक वर्ष तो तेथेच राहत होता. लकडावालाविरोधात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी दोन डझनहून अधिक केसेस नोंद आहे. ज्यामध्ये हत्या, खंडणी, धमकावणे, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे


हेही वाचा – पहिली ते चौथीच्या शाळा उघडणार मार्चमध्ये