गिरीश महाजनांना चित्रपटात काम करायचंय

अजित पवार, जयंत पाटील, विखे-पाटलांनाही भूमिका देण्यासाठी चित्रपट निर्मात्याला गळ घातली

Girish Mahajan

जामनेर – भाजप नेते गिरीश महाजन यांनी चक्क चक्क एका निर्मात्याकडे आपल्याला भूमिका देण्याची मागणी केलीय. केवळ आपल्या एकट्यालाच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही चित्रपटात घेण्याची विनंती केलीय.

तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपटच बनवावा लागेल, असे सांगत निर्मात्यानेही महाजनांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला. जामनेर येथे हलगट या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबूराव घोंगडे यांनाच थेट चित्रपटात संधी देण्यासाठी गळ घातली.

महाजन म्हणाले की, माझ्या सहकारी मंत्र्यांची आणि माझी आता सहा टर्म झाले आहेत. ३० वर्षे आमदारकीची झाल्याने आता पक्ष तरी एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार. त्यामुळे आम्हाला उमेदवारी नाही दिली तरी आणि आम्ही रिटायर्ड झालो तरी भविष्यात आम्हालाही चित्रपटात काम करण्याची संधी द्यावी.

तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढावा लागेल

चित्रपट निर्माते बाबूराव घोंगडे यांनीही महाजनांच्या वाक्यावर अचूक षटकार लगावला. तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईल, असे घोंगडे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये मात्र एकच हास्यकल्लोळ झाला. जामनेर येथील घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केलीय. विशेष म्हणजे, या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.