प्रियकराने नंबर ब्लॉक करुन दुसरीसोबत केले लग्न; नैराश्यातून प्रेयसीची आत्महत्या

girl suicide after breakup
प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याण पश्चिम येथे एका २१ वर्षीय कॉलेज तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून संसार थाटल्यामुळे नैराश्याच्या भरात या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कल्याण वालधुनी परिसरात राहणारे रिक्षा चालक यांची २१ वर्षाची मुलगी शेवटच्या वर्षाला कॉलेजमध्ये शिकत होती. मागील काही वर्षांपासून तिचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र प्रियकराने मागील महिन्यात दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केले आणि आपल्या प्रेयसीचा मोबाईल क्रमांक ब्लॉकलिस्टमध्ये टाकला होता. प्रियकराने दुसरीसोबत लग्न केले असून आपला मोबाईल क्रमांक ब्लॉक केला असल्याचे तिच्या लक्षात येताच तिला नैराश्य आले. तिने हा प्रकार आपल्या जवळच्या एका मैत्रिणीला सांगितला होता.

शिक्षणासोबत एका बड्या मोबाईल कंपनीत नोकरी करणाऱ्या या तरुणीने नैराश्यात राहत्या घराच्या पोटमाळ्यावर ओढणीने गळफास घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केला. हा प्रकार वडील दुपारी जेवायला घरी आले असता त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन मृतदेह खाली उतरवला. दरम्यान पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी या तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून प्रियकर शोएब शेख याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.