घरताज्या घडामोडीराज्यपाल-मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रयुद्ध!

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रयुद्ध!

Subscribe

राजभवनातून महाविकास आघाडी सरकारपुढे सातत्याने येणार्‍या आव्हानांचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पाठवलेल्या पत्रात केंद्राच्या सुचनांचा अनादर होत असल्याच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. राज्यपाल कोश्यारी यांच्या या पत्राचा मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक शब्दात समाचार घेत महाराष्ट्राचा अवमान करणार्‍यांचा जिथे सन्मान होतो, त्यांनी आपल्याला हिंदुत्व शिकवू नये, असे खडेबोल सुनावले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील या पत्राचाराने देशभर एकच खळबळ उडाली आहे.

ही धर्मनिरपेक्षता आली कुठून

राज्यपाल कोश्यारींची मुख्यमंत्र्यांवर टीका

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील वाद काल अधिकच टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ठरल्याची शेरेबाजी करणार्‍या कोश्यारी यांनी लॉकडाऊन उठवल्यानंतरही राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याच्या केलेल्या सुचनेवर कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यपालांनी सरकारला खडेबोल सुनावणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सरकारच्या कोरोना नीतीवर टीका केली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्ष कसे झालात असे विचारले.

- Advertisement -

राज्य सरकारच्या लॉकडाऊनला जनता वैतागली असल्याचे सांगताना नव्याने प्रार्थना स्थळे उघडण्याकरता जनतेत आशेचा किरण निर्माण झाला होता. तरीही ही बंदी कायम ठेवून तुमच्या सरकारने जनतेच्या अपेक्षांचा अनादर केल्याचे कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. चार महिन्यांनंतरही प्रार्थनास्थळे सुरू होत नाहीत हे पटणारे नाही. एकीकडे सरकार रेस्टॉरंट आणि हॉटेल सुरू करायला परवानगी देते, समुद्रावर फिरायला संमती देते आणि दुसरीकडे मात्र मंदिरे बंद ठेवून देव-देवतांना लॉकडाऊनमध्ये ठेवत असल्याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हा प्रचंड विरोधाभास तुमच्या सरकारने राज्यात निर्माण केल्याचा ठपका राज्यपालांनी सरकारवर ठेवला. गेल्या तीन महिन्यात राज्यातील विविध प्रार्थनास्थळांचे पुजारी, राजकीय नेते आणि एनजीओंनी प्रार्थनास्थळे उघडण्याची विनंती माझ्याकडे केली.

मी तुम्हाला कळवूनही यावर कृती झाली नाही, असा नाराजीचा सूर त्यांनी पत्रात आळवला. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देताना तुम्ही हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहात, पदाची शपथ घेतल्यावर अयोध्या दौर्‍यात आपण भगवान श्रीरामावरील भक्तीचे जाहीर दर्शन घडवलेत. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईची पूजा केलीत; पण प्रार्थनास्थळे उघडली नाहीत. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की काय, याचे मला आश्चर्य वाटते, अशा शब्दात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती धर्मनिरपेक्षता तुम्ही अंगिकारली की काय, याचेही कुतूहल वाटते, असे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना खोचकपणे विचारले. दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडण्यात आली होती. तेव्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे कोविड संबंधी काळजी घेण्याच्या सर्व सूचना देऊन प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा करावी, असे राज्यपालांनी या पत्रात सुचवले.

- Advertisement -

=सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीऐवजी राज्यपालांचे प्राधान्य भाजपला
= शपथविधीवेळी मंत्र्यांनी घेतलेली महापुरूषांची नावे राज्यपालांना खटकली
= मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवायला विरोध
=राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा पाच महिन्यांनंतरही रिक्त
= कोरोना काळात राज्यपालांनी घेतल्या अधिकार्‍यांच्या स्वतंत्र बैठका

माझ्या हिंदुत्वाला तुमचे प्रमाणपत्र नको

मुख्यमंत्री ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर पलटवार

माझ्या महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणार्‍यांचे हसत स्वागत करणार्‍यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. तुम्ही केलेल्या माझ्या हिंदुत्वाचा उल्लेख योग्यच आहे; पण माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला जशास तसे उत्तर दिले आहे. माझ्या राज्याला, राजधानीला कोणी दोष देणार असेल, तर तो माझ्या राज्याचा अवमान आहे, तो अवमान राज्यपाल म्हणून आपलाही आहे. तेव्हा हा अवमान खपवून घेणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरसंधान साधले.त्यामुळे पुढील काही दिवस दोघांमध्ये पत्रयुद्ध सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. विशेष म्हणजे या पत्रासोबत त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेली निवेदने पाठवली आहेत. राज्यपालांच्या या पत्राचा आपण आदरपूर्वक विचार करू, पण श्रध्दा जपताना कोणाच्या जीविताशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही, तो मलाही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे होते तसे तो लागलीच उठवणे हे जीविताशी खेळण्यासारखे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाला सोबत घेऊन लोकांनी धोका टाळला पाहिजे यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. अशा प्रकारची मोहीम सुरू करणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे सांगताना या मोहिमेत आरोग्यविषयी सूचना, जनजागृती, आरोग्य तपासणी, चाचण्या घेणे असे उपक्रम राबवले जात आहेत. राज्यातील असंख्य डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन ही कामे करत आहेत. याची आपल्याला कल्पना असावी, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना करून दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाच्या केलेल्या उल्लेखाचा मुख्यमंत्र्यांनी जोरदार समाचार घेतला. आपण केलेला उल्लेख योग्य आहे. यासाठी कोणी मला प्रमाणपत्र द्यावे, याची आवश्यकता नाही. हे हिंदुत्व कोणाकडून शिकण्याचीही मला आवश्यकता नाही, असे सांगत माझ्या राज्याची प्रगती स्वाभिमान हा हिंदुत्वाचा बाणा आहे. माझ्या राज्याला किंवा राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्‍यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असे आपले म्हणणे असेल तर राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे तो आपल्याला मान्य नाही काय, अशी थेट विचारणा करून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची चांगलीच अडचण केली आहे.

या संकटाशी लढताना काही दैवीशक्ती आड येतात का, असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कठोर शब्दात चांगलेच झापले. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे उद्धव ठाकरेंनी बजावले. राज्यपालांनी विविध शिष्टमंडळांचा उल्लेख आपल्या पत्रात केला होता. मात्र, आपल्या पत्रासोबत पाठवलेली पत्रे ही भाजपच्या नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांची आहेत. याचा उल्लेख करत भाजपेतर संस्था आणि नेते न भेटणे हा केवळ योगायोग असावा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला. राज्यपालांचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी शेवटी आपल्या विनंतीचा मान राखून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले; पण जनतेच्या जीवितालाही तितकेच महत्त्व दिले जाईल, असे स्पष्ट केले.

= वादळाची नुकसान भरपाई वेळेवर न दिल्याने सरकारवर मारलेले ताशेरे
=अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल-ठाकरे यांच्यातील तू तू मै मै
= सुशांत सिंह मृत्यू प्रकरण आणि कंगना रानौत प्रकरणावरून बेबनाव
= कोरोनाच्या काळात सरकारकडून करण्यात येणार्‍या अपुर्‍या उपाययोजना
= मंदिरांसह प्रार्थनास्थळे उघडण्याची मुख्यमंत्र्यांना करून दिलेली आठवण

कोश्यारींच्या पत्रातील भाषा असंवैधानिक
धार्मिकस्थळे उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार काय?, असा परखड सवाल शरद पवार यांनी मोदींना केला आहे. राज्यपालांचे हे वागणे संविधा-नाच्या चौकटीबाहेरचे अस-ल्याची टीकाही केली.

मुख्यमंत्र्यांचे उत्तर दुर्दैवी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला ज्या प्रकारे उत्तर पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -