Guillain Barre Syndrome पुणे : कोरोना महामारीनंतर राज्यातील जनता गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने चिंतीत आहे. कारण गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे सातत्याने पुण्यात रुग्ण वाढत आहेत. सध्या पुण्यातील या आजाराच्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभाग या आजाराच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आलं आहे. तसेच, पुणे महानगर पालिकाही सतर्क झाली असून पुणेकरांना आयुक्तांकडून विशेष सूचना दिल्या जात आहेत. (Guillain Barre Syndrome patients increase in Pune Important instructions from the Health Minister and Municipal Commissioner)
पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे झालेला हा राज्यातला पहिला मृत्यू आहे. सध्या 16 गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची राज्यात एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत.
पुणेकरांना महापालिका आयुक्तांच्या सूचना
पुण्यातील वाढत्या गुलियन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुणेकरांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. “पुणे महानगर पालिकेकडून कमला नेहरू रुग्णालयात 15 आयसीयू बेड जीबीएस बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, या रुग्णालयात जीबीएसबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. आम्ही 200 इम्युनोग्लोबलिन इंजेक्शन्स खरेदी केले आहेत. हे इंजेक्शन्स ज्या खासगी रुग्णालयांमध्ये जीबीएस बाधित रुग्ण दाखल झाले आहेत, त्या रुग्णालयांना पुरवणार आहोत. जेणेकरून तिथल्या रुग्णांचा उपचार खर्च कमी होईल. त्याव्यतिरिक्त ज्या रुग्णांना उपचाराचा खर्च परवडणार नाही, अशा रुग्णांसाठी पुणे महानगर पालिकेत शहरी गरीब योजना राबवण्यात येणार आहे. त्या योजनेच्या माध्यमातून रुग्णांच्या उपचारांचा खर्च केला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मी आरोग्य विभागाच्या चार सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना या सर्व खासगी रुग्णालयांमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता केली जाईल”, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
पिण्याच्या पाण्याबाबत महत्त्वाच्या सूचना
“पाण्याचे काही नमुने तपासले जात आहेत. मात्र त्यात गुलियन बॅरी सिंड्रोमचे विषाणू आढळलेले नाहीत. तरीही सर्व नागरिकांना पाणी उकळवून पिण्याचं आवाहन करत आहोत. सध्याच्या परिस्थितीत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही”, असेही महापालिका आयुक्त म्हणाले.
राज्यातील आरोग्यमंत्र्यांची मोठा घोषणा
गुलियन बॅरी सिंड्रोम रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मयदित दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून 80 हजार रुपये दिले जात होते. ती आता दुप्पट करत एक लाख 60 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली.
हेही वाचा – Gondia Accident : दुचाकीला बोलेरोची धडक, अपघातात आईसह पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू