डोंबिवलीच्या सोनारपाडा येथे गोदमाला भीषण आग जीवितहानी टळली

huge fire broke out at a warehouse at Sonarpada in Dombivali
डोंबिवलीच्या सोनारपाडा येथे गोदमाला भीषण आग, जीवितहानी टळली

डोंबिवलीमध्ये सोनारपाडाजवळ एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. आगीच्या ठिकाणी स्फोटांचे आवाज आल्यामुळे परिसर हादरून गेला आहे. आग विझवण्यासाठी कल्याण, अंबरनाथ नवी मुंबई येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आलेल्या असून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आली आहे. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

डोंबिवली पूर्व भागातील सोनारपाडा परिसरात एमआयडीसी फेज २ला लागून असलेल्या एका गोदामामध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक भंगाराचे गोदाम होते. दुपारी अचानक या गोदामाला आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळांनी स्फोटाचा आवाज आला. स्फोटाच्या आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि एकच धावपळ उडाली. आगीचे लोट शहरात दूरपर्यंत पाहण्यास मिळत होते.

प्राथमिक माहितीनुसार, सोनारपाडा परिसरात भंगाराचे अनेक गोदाम आहेत. या गोदामांमध्ये टीव्ही, फ्रीज, यासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स ठेवण्यात आलेले आहेत. या गोदामापैकी एका गोदामाला आग लागली, त्यानंतर ही आग आजूबाजूच्या गोदाम आणि दुकानापर्यंत पसरत गेली.

आगीची माहिती मिळताच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि नवी मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आगीच्या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डोंबिवलीतील गोदामाला भीषण आग | Fire breaks out in godown in dombivli sonarpada

डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत सात ते आठ गोदामाने जळली गेली. ही आग इतकी भीषण होती की, आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, December 9, 2020

 


हेही वाचा – हे तर भांडवलदारांचे केंद्र सरकार