कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गाड्यांना उदंड प्रतिसाद, १३ ऑगस्टनंतरही विशेष एसटी सेवा

१३ ते २१ ऑगस्टपर्यंत विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याने चाकरमान्यांची कोंडी दूर झाली आहे.

Huge response to trains going for Ganeshotsav in Konkan
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गाड्यांना उदंड प्रतिसाद, १३ ऑगस्टनंतरही विशेष एसटीसेवा

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे चाकरमान्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. उत्सवकाळात कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या आणि एसटी बसगाड्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गांवरील गाड्यांचे आरक्षण शंभर टक्क्यांपुढे पोहोचले आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १२ ऑगस्टनंतरही एसटीच्या विशेष बस चालवल्या जाणार आहे. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – १९ ची चाचणी करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह असेल तरच संबंधितांना प्रवास करता येईल.

मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून चाकरमान्यांसाठी १३ तारखेपासून या बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत. या बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील.राज्य परिवहन महामंडळाने चाकरमान्यांसाठी करण्यात येत असलेल्या बस व्यवस्थेची माहिती आज जाहीर केली. कोकणासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण १५० अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई आणि पुणे विभागातून गौरी-गणपतीसाठी जादा सेवा देण्यात येत आहे.

गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरू होत असून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने ६ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथून प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरू केल्या आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज अखेर तब्बल १० हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. परतीच्या प्रवासाचे आरक्षण देखील एकाचवेळेस करता येणार आहे. योग्यरित्या सॅनिटाइझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून, कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच राज्य शासनाने काही नियम व अटी घातले आहेत आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड- १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही.तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही. १३ ते २१ ऑगस्टपर्यंत विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याने चाकरमान्यांची कोंडी दूर झाली आहे.


हेही वाचा – Maharashtra CET Exam 2021: : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द