पनवेलमध्ये गणेश विसर्जनासाठी ६३ ठिकाणी विसर्जन घाट

गणेश विसर्जन घाटांची साफसफाई करण्यात आली आहे.

Immersion spot at 63 places for visarjan of Ganesha in Panvel
पनवेलमध्ये गणेश विसर्जनासाठी ६३ ठिकाणी विसर्जन घाट

काही दिवसांवर येऊ घातलेल्या गणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने जोरदा अंतर्गत तयारी सुरू केली आहे. विसर्जनासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चार प्रभागातील ६३ ठिकाणी विसर्जन घाट बनवले जात असून, तलाव स्वच्छतेचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी ‘महानगर’शी बोलताना स्पष्ट केले.दहा तारखेला गणोत्सवाला सुरूवात होणार असून दीड दिवस,पाच दिवस, सात दिवस, दहा दिवसाच्या बाप्पांच्या विसर्जनानुसार महापालिकेडून व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच मागील वर्षाप्रमाणे कोरोनाच्या नियमांचे पालन करून गणपती विसर्जन करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पनवेल शहरातील प्रभाग ‘ड’ मधील बल्लाळेश्वर गणेश विसर्जन घाट, प्रभाग क्रमांक १९ कोळीवाडा पक्की गणेश विसर्जन घाट, तक्का गणपती विसर्जन घाट या गणेश विसर्जन घाटांची साफसफाई करण्यात आली आहे.

प्रभाग ‘क’ कामोठे मधील सेक्टर १४ मधील शंकर मंदिर विसर्जन घाट, जुई गाव विसर्जन घाट, सेक्टर ३४ कृत्रिम तलाव विसर्जन घाट, सेक्टर ६ मधील जुही रेसिडेन्सी विसर्जन घाट येथील स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत कळंबोलीमधील येथील से.१२, टेम्भोडे, वळवली, खिडुकपाडा गाव, वालदेश्वर मंदिर, प्रभाग क्रमांक १० मधील कलंबोली गाव स्मशानभूमी जवळ, शंकर मंदीर लगत, प्रभाग क्रमांक १६ मधील आदई तलाव येथे गणेश मूर्तींचे विसर्जन होत असते. या तलावांची साफ सफाई करणे, तलावाजवळील गवत, कचरा काढण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. बांधकाम विभागच्या वतीने विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय देखील करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्यावतीने लोखंडी टाक्या, प्लॅस्टिक टाक्या त्या त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.


हे ही वाचा – Sidharth Shukla death-सिद्धार्थच्या मृत्यूचं गूढ वाढलं,पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट