घरताज्या घडामोडीरायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलिफिशचे पुन्हा थैमान ; जाळ्यात मासळीपेक्षा जेलिफिश दुप्पट

रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलिफिशचे पुन्हा थैमान ; जाळ्यात मासळीपेक्षा जेलिफिश दुप्पट

Subscribe

बाणकोट ते बागमांडला खाडीपासून मुरुडच्या समुद्रात पुन्हा जेलिफिशचे थैमान सुरू झाले असून, मोठी मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. परिणामी पुन्हा एकदा मच्छीमार संकटात सापडले आहेत.महिन्यापूर्वी जेलिफिशचे असेच संकट आले होते. आता पुन्हा जेलिफिश आले असून, किनारपट्टी किंवा समुद्रात सर्वत्र त्यांचे आक्रमण झाल्याने मासेमारी कुठे आणि कशी करायची, असा सवाल उभा राहत असल्याची माहिती मुरुड तालुक्यातील एकदरा गावचे मच्छीमार गजानन वाघ, रोहन निशाणदार, एकदरा येथील हनुमान मच्छीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली. मासेमारीच्या ऐन हंगामामध्ये हा प्रकार सुरू झाल्याने मच्छीमार हवालदिल झाला असून, मासेमारी सतत ठप्प होतना दिसून येत आहे. रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष तथा कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोहर बैले यांनी देखील बागमांडल्यापासून भरडखोल, राजपुरी, दिघी, मुरुड, बोर्ली, कोर्लई, रेवदंडा, अलिबाग, उरण आणि उर्वरित किनार्‍यावर जेलिफिशचे पुन्हा थैमान सुरू झाल्याचे सांगितले.

मासे अत्यंत कमी मिळत असून, जेलिफिश तिप्पट मिळत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याला धोका उद्भवत असून, प्रचंड आर्थिक नुकसान होताना दिसत आहे. मच्छीमारांवर येत असलेल्या विविध संकटांत दाहक जेलिफिश हेही एक संकट असून, यामुळे ऐन हंगामात मोठी मासळी मिळणे ठप्प झाले आहे. रत्नागिरीच्या बाणकोटपासून बागमांडला, आदगाव, कुडगाव, दिघी, राजपुरी, दिघीपासून रेवदंडा, आक्षी ते अलिबाग, उरण किंवा त्याहीपेक्षा पुढे जेलिफिशचे आक्रमण दिसून येत आहे. जेलिफिश च्या काही जाती असून, ऑस्ट्रेलियन जेलिफिश अत्यंत विषारी असतात. या परिसरातील जेलिफिशचा स्पर्श झाल्यास मोठा दाह होतो. जेलिफिशमुळे पापलेट, सुरमई, रावस, कुपा, घोळ, कोळंबीसारखी मासळी दूरवर पलायन करते. त्यामुळेच मासळी मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे बाजारात मासळीचा दुष्काळ निर्माण होत आहे.

- Advertisement -

जेलिफिश समुद्रात तळाशी असतात. समुद्रात अवैध एलईडी मासेमारी सुरू असल्याने प्रखर लाईटमुळे सुप्त अवस्थेत असणारे जेलिफिश सक्रीय होऊन समुद्रात किंवा किनार्‍यावर यायला लागतात आणि सर्वत्र पसरतात. त्यानंतर मासळी मिळणे अशक्य बनते, अशी माहिती गजानन वाघ आणि रोहन निशाणदार यांनी दिली. डिझेल खर्चून समुद्रात जाण्याचे यामुळे टाळले जाते असेही ते म्हणाले. सध्या मुंबईतून परिसरात मासळी येत असून, अन्यत्र ठिकाणच्या समुद्रातील मासळी मिळणे सध्या तरी बंद आहे. उरण येथील मच्छीमारांनी सांगितले की, मासेमारीस गेल्यानंतर १ टन मासळी मिळाली तर त्यामध्ये २ ते ३ टन जेलिफिश सापडत असून, दाहक असल्याने ते काढून समुद्रात फेकून देणे देखील अवघड झाले आहे.

 

- Advertisement -

   वार्ताहर : अमूलकुमार जैन


 हे ही वाचा – भाजप-महाविकास आघाडीचं ठरलं! चार जागा बिनविरोध तर दोन जागांवर होणार लढत


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -