घरताज्या घडामोडीबाबरी मशीद खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

बाबरी मशीद खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Subscribe

लखनौ सीबीआय कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने बुधवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. २८ वर्षांनंतर या वादग्रस्त विषयावर कोर्टाने निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण कोर्टाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रात नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, काहीही छायाचित्रांद्वारे सिद्ध होत नाही. या प्रकरणात पुराव्यांमध्ये छेडछाड केली गेली. फोटो, व्हिडिओ, फोटोकॉपी ज्या पद्धतीने मांडल्या गेल्या, त्या पुरावा म्हणून मान्य नाहीत.

2300 पानांच्या निर्णयामध्ये विशेष न्यायाधीश एस.के. यादव म्हणाले की, केवळ छायाचित्रांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवले जाऊ शकत नाही. सर्व आरोपींनी बाबरी मशीद वाचवण्याचा प्रयत्न केला. अचानक गर्दी तिथे आली आणि जमावाने बाबरी पतन केली. ज्यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट केली गेली होती, त्या 32 लोकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. विशेष न्यायाधीश एस. के. यादव म्हणाले की, ही घटना पूर्वनियोजित नव्हती, संघटनेने बर्‍याच वेळा थांबण्याचा प्रयत्न केला. ही घटना अचानक घडली आणि जमावाने बाबरी पतन केली. विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख असलेले अशोक सिंघल यांच्याविरूद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

- Advertisement -

कोर्टाने एकूण 32 आरोपींवर बुधवारी निकाल दिला. यावेळी आरोपींपैकी साध्वी ऋतुंभरा, विनय कटियार, चंपतराय, साक्षी महाराज आणि जय भगवान गोयल हे न्यायालयात उपस्थित होते. तर आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी न्यायालयात उपस्थित नव्हते. या प्रकरणावर निकाल देताना न्यायमूर्ती एस.के. यादव यांनी सांगितले की, बाबरी मशीद ही नियोजनबद्धरितीने पाडण्यात आलेली नाही. नेत्यांनी कारसेवकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींच्या विरोधात फोटो, व्हिडिओ आणि फोटोकॉपीच्या माध्यमातून पुरावे देण्यात आले. मात्र, त्यामधून काहीही सिद्ध होत नाही. तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्याविरोधात काहीही पुरावे मिळालेले नाहीत, असे सांगत न्यायमूर्तींनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

बाबरी मशीद पतन प्रकरणाबाबत माहिती
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतुंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनावणीदरम्यान निधन झाले.

- Advertisement -

लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केला
कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अडवाणी यांनी म्हटले आहे की, ‘आजचा हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आम्ही सर्वजण यामुळे अत्यंत आनंदी आहोत. ज्यावेळी निकाल ऐकला त्यावेळी ‘जय श्री राम’ म्हणून आम्ही या निर्णयाचे स्वागत केले’ असे अडवाणींनी म्हटले आहे.

हा निकाल देशहिताचा नाही – प्रकाश आंबेडकर
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाटण्यातून दिली. लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे. तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

आमचे आंदोलनात कोणतेही षड्यंत्र नव्हते हे सिद्ध झाले. आम्हाला खूप आनंद झाला आहे. कोर्टाने आता हा निर्णय दिला असून हा वाद संपला पाहिजे. संपूर्ण देशाला राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला लागले पाहिजे.
-मुरली मनोहर जोशी, नेते भाजप

या निकालामुळे सत्यवादी लोकांच्या मनात भीतीची भावना निर्माण होईल आणि अपप्रवृत्ती आनंद साजरा करतील. जेव्हा न्याय होत नाही तेव्हा सत्याच्या बाजूने असलेल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण होते. तर चुकीचे वागणारे लोग आनंदीत होतात. जेव्हा निकाल सरकारला खूश करण्यासाठी दिला जातो तेव्हा निकाल देणार्‍याला अपार संपत्ती आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते. आता असे वारंवार घडेल अशी शंका येते. भारत ज्युडीशरी ऐवजी मोदीशरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. -अधीररंजन चौधरी, खासदार, काँग्रेस

खटल्यातील महत्त्वाचे मुद्दे
= सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. तपास संस्थेने विशेष कोर्टासमोर पुरावा म्हणून ३५१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्रे सादर केली.
=एकूण ४८ आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते; पण १६ जणांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला.
= १६ व्या शतकातील अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले व कारसेवकांना चिथावणी दिली हा सीबीआयचा आरोपींविरोधातील मुख्य युक्तिवादाचा मुद्दा होता.
= आम्ही दोषी आहोत, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. तत्कालिन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राजकीय वैर भावनेतून आपल्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवले आहे, असा आरोपींनी स्वत:च्या बचावासाठी युक्तिवाद केला.

शिवसेनेकडून निकालाचे स्वागत
सीबीआय विशेष न्यायालयाच्या निकालानंतर या गोष्टी विसरायला हव्यात. आता अयोध्येत राममंदिर निर्माण होत आहे. बाबरीचा ढाचा पाडला नसता तर अयोध्येत राम मंदिर बनले नसते. शिवसेनेकडून लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांचे अभिनंदन. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत जाऊन भूमिपूजन केले तेव्हाच बाबरीचा खटला संपला आहे. आता न्यायालयाला आणि खटल्याला काहीच महत्त्व राहत नाही. बाबरी पाडली म्हणून राम मंदिर उभे राहिले, असेही राऊत म्हणाले.

आता भारतात असा कुठला वाद होऊ नये-इक्बाल अन्सारी 
6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यासंदर्भात पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही भारतीय मुस्लीम आहोत. कोर्ट साक्षीदाराच्या आधारे निर्णय देते. सीबीआय साक्षीदार देण्यास कमी पडले. त्यामुळे निर्णय कोर्टाने दिला आहे. आता वाद संपला आहे ही चांगली गोष्ट आहे. आता भारतात असा कुठला वाद होऊ नये. देशात माणूस म्हणून माणसांकडे पाहावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -