घरताज्या घडामोडीकोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवकांच्या विरोधानंतरही जाधव स्थायी समितीवर यशवंत

कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवकांच्या विरोधानंतरही जाधव स्थायी समितीवर यशवंत

Subscribe

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह जवळपास सगळ्याच ज्येष्ठ नगरसेवकांचा विरोध असतानाही शिवसेनेने स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी तिसर्‍यांदा यशवंत जाधव यांनाच उमेदवारी देत हॅट्ट्रिक होऊ दिली आहे. स्थायी समितीच्या कामातील मनमानी, सहकारी लोकप्रतिनिधीं- समोर आपल्या आर्थिक ताकदीची करण्यात येणारा बडेजाव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबरचे मतभेद यामुळे ‘मातोश्री’ने यशवंत जाधव यांना स्थायीच्या अध्यक्ष पदावरून दूर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

मात्र कोरोनामुळे वाया गेलेले सहा महिने आणि आगामी दोन महिन्यांत विशेष काही होणार नसल्याने जाधव यांनाच स्थायीवरुन अस्थायी करण्याचा कार्यक्रम एप्रिल महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतीच अंमलीपदार्थ प्रकरणी यशवंत जाधव यांच्या मुलाची पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे त्यांच्या विरोधातील तक्रारीमध्ये भरच पडली होती. याबाबत ’आपलं महानगर’ ने बातमी दिल्यावर पालिकेसह शिवसेनेचे वर्तुळ हादरून गेले होते.

- Advertisement -

यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्याकडे या प्रकरणाची विचारणा केली असता राज्याचे मुख्यमंत्रीपद हाती असलेल्या आणि सगळे प्रशासन मुठीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे ही स्पष्टीकरण देताना स्थायी समिती अध्यक्षांनी चुकीचा तपशील सादर केला. पोलिसांकडून खरी वस्तुस्थिती कळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याबाबत खासगीत नाराजी व्यक्त केली होती. पालिकेतील जबाबदार आणि प्रमुख नेता वादाच्या भोवर्‍यात अडकल्यानंतर यशवंत जाधव यांचे विरोधक आक्रमक झाले होते. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर जाधव यांचे पटत नसल्याने माजी महापौर, माजी आमदार विशाखा राऊत, राजुल पटेल, रमाकांत रहाटे, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर अशा सगळ्याच ज्येष्ठ नगरसेवकांनी जाधव यांच्या कार्यशैलीबद्दल मातोश्रीवर अनेक तक्रारी केल्या होत्या. गेली दोन वर्षे स्थायी समितीवर असणार्‍या यशवंत जाधव यांनी आपल्या पक्षातील अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधींसह युवा नगरसेवकांनाही दुखावले आहे. त्याच वेळेला विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या कामांना झुकते माप देण्याची कार्यशैली जाधव यांनी अवलंबिली आहे.

आर्थिकदृष्ठ्या प्रबळ असलेल्या जाधव यांच्याकडून सातत्याने आपल्या पदाची घमेंड वारंवार दाखवली जात असल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली आहे. याआधी राहुल शेवाळे चार वेळा, सदा सरवणकर चार वेळा, रविंद्र वायकर चार वेळा, दत्ता दळवी तीन टर्म, शैलेश फणसे तीन टर्म, सुनील प्रभू एक वर्ष स्थायी समितीवर अध्यक्ष राहिले होते. मात्र पद आणि स्थायीची ’साय’ याचा वापर या नेत्यांनी आपल्या सहकार्‍यांचा पाणउतारा करण्यासाठी केलेला नाही. रविंद्र वायकर यांनी तर स्थायी समिती अध्यक्षपदी असताना शिवसेना भवनाचे नूतनीकरण मार्गी लावले. राहुल शेवाळे यांच्या कार्यशैलीबद्दल मतमतांतरे होती मात्र त्यांनी सरसकट लोकप्रतिनिधींचा रोष ओढवून घेतला नाही उलट याच पदावरून राहुल यांनी मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये जागा मिळवली. सदा सरवणकर यांनी तर आपल्या कारकीर्दीत विभागातील अनेक तरुणांना नोकरीच्या-रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सुनील प्रभूंचा विनम्रपणा, पक्ष आणि शिवसैनिकांशी त्यांचा समन्वय याचे आजही पालिकेत दाखले दिले जातात. मात्र पालिकेत पक्षातील विशेष विरोधक नसतानाही जाधव यांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून सगळ्या विरोधकांना एकसंध राहण्याची संधी दिल्याचे एका ज्येष्ठ नगरसेवकाने सांगितले.

- Advertisement -

विनम्र आणि संयमी राजकारणाची कास धरणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना यशवंत जाधव यांची कार्यशैली रुचत नाही. जाधव यांच्याबाबत सर्व स्तरांतून येणार्‍या तक्रारींची दखल पक्षनेतृत्वाने घेऊन त्यांच्या जागी दुसर्‍या नेत्याला संधी देण्याचे निश्चित केले होते. मात्र कोरोनामुळे आधीच सहा महिने वाया गेले आहेत. सभागृह होत नाही, वैधानिक समित्यांच्या बैठका होत नाहीत. अशा वेळी नव्या नेत्याला अर्धवट कार्यकाळाची संधी देण्यापेक्षा एप्रिलमध्ये नव्याने संधी द्यावी असा पवित्रा मातोश्रीने घेतला आहे. कोविडसाठी करण्यात आलेल्या अनेक कामांवर विरोधकांचे प्रश्न आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी यशवंत जाधव यांनाच पुन्हा कायम ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन यशवंत जाधव यांना कडक समज देऊन त्यांच्या निर्णय आणि कार्यपध्दतीवर ‘डॉगवॉच’ ठेवण्याची गरज दोन माजी महापौरांनी बोलून दाखवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -