JNPT : महामार्गावर पार्किंग करणार्‍या अवजड वाहनांवर उरण वाहतूक शाखेची कारवाई

JNPT: Action taken by Uran Transport Branch against heavy vehicles parked on the highway
JNPT : महामार्गावर पार्किंग करणार्‍या अवजड वाहनांवर उरण वाहतूक शाखेची कारवाई

जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील उरण – पनवेल व उरण – जेएनपीटी महामार्गावर अवजड कंटेनर ट्रेलर पार्किंग करणार्‍यांवर न्हावाशेवा वाहतूक पोलिसा बरोबर आत्ता उरण वाहतूक शाखेनेही कंबर कसली आहे. महामार्गावर उभ्या करण्यात येणार्‍या अवजड कंटेनर ट्रेलरमुळेच मोठमोठे अपघात व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने महामार्गावरीलअवजड वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी हाती घेतली आहे.

यामध्ये पनवेल – जेएनपीटी महामार्गावरील एल डी टोलनाका, धुतूम, आयओटीएल सह अन्य महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग हटविण्याची मोहीम हाती घेतल्याने तालुक्यातील महामार्ग मोकळे होऊ लागले आहेत. पनवेल – जेएनपीटी हा सर्वात जास्त अवजड वाहतुकीच्या रहदारीचा महामार्ग असून,या महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे कंटेनर ट्रेलर पार्किंग करीत असल्याने नियमित वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
या शिवाय तालुक्यातील सर्वच गोदामात कंटेनर ट्रेलर पार्किंगच्या जागेवर भाड्याच्या लालसेपोटी कंटेनर ठेवले जात आहेत.त्यामुळे जेएनपीटीने अशा पार्किंगच्या ठिकाणी गोदामात कंटेनर ठेवणार्‍या गोदामांवरही कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

दरम्यान महामार्गावरील पार्किंग करणार्‍या अवजड वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाईमुळे  प्रवासी वाहतुकीचा
अडथळा दूर होण्यास मदत होऊ लागली आहे. त्यामुळे उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक संजय पवार ,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस हवलदार शेंडे ,महिला पोलिस हवालदार निता डाऊर, पोलिस नाईक विशाल भिसे या वाहतूक पोलिस पथकाने उरण तालुक्यातील
रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.


हे ही वाचा : सुरेश लाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा