सिडको करणार पनवेल महानगरपालिककडे जम्बो कोविड सेंटरचे हस्तांतरण

पनवेलच्या कॉटन कार्पो.च्या गोदामात ६३५ खाटांचे कोव्हिड सेंटर

Jumbo Covid Center to be handed over to Panvel Municipal Corporation soon
जम्बो कोविड सेंटरचे लवकरच पनवेल महानगरपालिककडे हस्तांतरण

संभाव्य तिसर्‍या कोरोना लाटेच्या पूर्वतयारीकरिता कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या (सीसीआय) गोदामांमध्ये ६३५ खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. येत्या काही दिवसामध्ये सिडको त्याचे हस्तांतरण महानगर पालिकेकडे करणार आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम, विद्युत, वैद्यकीय आरोग्य, पाणी पुरवठा,अग्निशमन विभागाने पाहणी करून रुग्णालय सुरू होण्याआधी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
या सेंटरमध्ये ५०५ ऑक्सिजन खाटा, आयसीयू प्रौढांसाठी १०० खाटा, आयसीयू पिडियाट्रिक २५ खाटा, ट्रायएजसाठी ५ खाटा असणार आहेत. सध्या या रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, विविध विभागात येत्या काही दिवसांत सर्व रुग्णालयीन उपकरणे बसविण्यात येणार आहेत. या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची सोय येत्या दोन दिवसात केली जाणार आहे. येत्या सप्टेंबरच्या महिन्याच्या सुरूवातीला सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. जेवण, औषधे, तसेच संबधित घटकांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात याची पूर्तता केली जाणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास पालिका क्षेत्रासह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून रुग्ण या ठिकाणी उपचारास येण्याची शक्यता असल्याने कळंबोलीचे जम्बो कोविड सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे. पालिकेतील संबधित विभागांनी या रुग्णालयावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर राहिलेली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आदेश देशमुख यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके आणि सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव आणि वंदना गुळवे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अधिकारी संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


हे ही वाचा – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय शुक्रवारी होण्याची शक्यता – नाना पटोले