कर्जत गार्बेज फ्री सिटी ; केंद्र सरकारकडून ३ स्टारचे नामांकन

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत कचरा मुक्त शहर आणि त्यासाठी राबविलेले विशेष उपक्रम याची पाहणी करण्यात येते. यात कर्जत नगर परिषदेने केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने त्याची दखल घेत गार्बेज फ्री सिटी म्हणून ३ स्टारचे नामांकन देण्यात आले आहे. नगर परिषदेचा भारत सरकारतर्फे दिल्लीत सत्कार करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे स्वरुप

भारत सरकार तर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नेमलेली एजन्सी शहारत येऊन परस्पर शहराचा पाहणी दौरा करते. कचरा आणि त्याची व्हिलेवाट, तसेच प्लास्टिक बंदी, निर्मूलन याबाबत माहिती घेते. तसेच नागरिकांना काय वाटते त्यांचे मत नोंदविण्यात येते आणि सर्व माहिती संकलित करून स्वच्छ भारत अभियान विभागाकडे पाठविण्यात येते. त्यानंतर मूल्यमापन करून पालिकेला मानांकन देण्यात येते.

नगर परिषदेचे विशेष उपक्रम

घरोघरीं जाऊन शंभर टक्के ओला, सुका कचरा गोळा करून घंटागाडीद्वारे डम्पिंग ग्राऊंडवर नेणे, तेथे त्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गिकरण करणे. ओल्या कचर्‍याच्या माध्यमातून बायोगॅसची निर्मिती करून त्या वीज निर्मितीतून त्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवे उजळविण्यात आले आहेत . तसेच कंपोस्ट खताची निर्मितीही करण्यात येते. एजन्सी मार्फत सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून मजबूत पेव्हर ब्लॉक बनविण्यात येत आहेत. त्या पेव्हर ब्लॉकचा वापर काही रस्त्यांसाठी करण्यात आला आहे. याचबरोबर कचर्‍यातील प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचे दाणे बनवत रिसायकलिंग करीत शहर प्लास्टिक मुक्त ठेवण्यात यश आले आहे.

आतापर्यंत नगर परिषदेला असे मानांकन मिळाले नव्हते. मात्र दोन वर्षांत कचरा मुक्त शहर करण्यासाठी आमच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य-स्वच्छता विभागाचे सुदाम म्हसे आणि त्यांच्या पथकाने, तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
-डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

बाजार पेठेत दिवसा आणि रात्री दोनदा कचरा उचलून नेण्यास गाडी येते. कचरा मुक्त शहर अभियानाला आम्हा व्यापार्‍यांकडूनही चांगला प्रतिसाद दिला जात आहे. आम्हीही कचर्‍याचे विलगिकरण करून ठेवतो. कचरा मुक्त शहरामुळे शहराचे सौंदर्य वाढते. नगर पालिकेचे स्वच्छता अभियान कौतुकास्पद आहे.
– अमित ओसवाल, कपडा व्यापारी, कर्जत

रुग्णालयातील जैविक कचरा निर्मूलन ही महत्त्वाची कामगिरी पालिकेचे सफाई कामगार नित्यनेमाने करतात. तसेच भाजी मार्केट, मासळी बाजार, हॉटेल आदी ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. हा कचरा वेळच्यावेळी उचलून नेत असल्याने शहर स्वच्छ राहत आहे. नगर परिषद स्वच्छतेबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करते. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
– प्रशांत उगले, सामाजिक कार्यकर्ता


हे ही वाचा – नागपुरातील केएसएल इंडस्ट्रीच्या मालकीच्या एम्प्रेस मॉलवर EDची कारवाई