खडसे-पवार यांची भेट दोन्ही नेत्यांकडून मात्र इन्कार

eknath khadse and sharad pawar
शरद पवार आणि एकनाथ खडसे

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. एकनाथ खडसे बुधवारी मुंबईत दाखल झाले. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली असे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ खडसे आणि शरद पवार या दोघांनीही या भेटीचा इन्कार केला.

शरद पवारांना एकनाथ खडसेंसोबत भेट होणार का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही.

एकनाथ खडसे यांनी आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. मी लपूनछपून राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही. जे करीन ते जाहीरपणे करीन, असेही खडसे म्हणाले.

याआधी २३ सप्टेंबरला शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचेही बोलले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. एकनाथ खडसेंनी स्वत: यावर भाष्य करत चर्चेला पूर्णविराम दिला होता. हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा, असे ते म्हणाले होते.