‘तू माझ्याशी बोलत का नाही’ म्हणत एका तरुणाने तरुणीवर हल्ला केल्याचे घटना नवी मुंबईत घडली आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयाने या गुन्ह्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवी मुंबईच्या रबाळे महामार्गावर एक तरुणी कॉलेजवरुन घरी परतत होती. त्यावेळी या मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलाने या मुलीला अडवले आणि त्याने तू माझ्याशी बोलत का नाहीस?, असा जाब विचारला. त्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्याप्रकरणी मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरुन हल्लेखोर तरुणालाही ताब्यात घेतले. तसेच तात्काळ पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजरही केले. न्यायालयाने संशयित आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नवी मुंबईतील नेरुळच्या डी. व्हाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रबाळे पोलीस या हल्ल्याप्रकरणी आता ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाची अधिक चौकशी करत आहेत. क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १ तारखेला ही घटना घडली होती. २२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी पीडित तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.