दगड-मातीच्या मलब्याखाली सापडल्या मृत म्हशी, मुंब्र्यातील दरडीमुळे दुर्घटना?

आपत्ती व्यवस्थापन कक्षेने त्या म्हशींचा मृत्यू दरडीमुळे नाहीतर पावसामुळे झाल्याचे म्हटले आहे. तसेच रस्त्यावर आलेला दरडीचा तो मलबा बाजूला करण्यात आला आहे.

मुंब्रा बायपास रोड, सैनिक नगर जवळील पनवेल कडून ठाण्याकडे येणारी वाहिनीवरील रस्त्यावरती दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी ११ वाजून ३८ मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेत दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर आला होता. तसेच या घटनेत दोन म्हशींचा मृत्यू झाला असे म्हटले जात आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्षेने त्या म्हशींचा मृत्यू दरडीमुळे नाहीतर पावसामुळे झाल्याचे म्हटले आहे. तसेच रस्त्यावर आलेला दरडीचा तो मलबा बाजूला करण्यात आला आहे. (Landslide in mumbra, 2 buffalo found dead)

गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस मुंब्र्यात दरड कोसळत आहे. त्यातच आज पुन्हा मुंब्रा बायपास रोडवर दरड कोसळली. यावेळी मोठे दगड आणि माती पडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी १-जे.सी.बी. मशिनसह व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांनी धाव घेतली. पडलेली दरड बाजूला करत मृत म्हशी उचलून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. मात्र, त्या म्हशी पडलेल्या दरडीमुळे नाहीतर सातत्याने सुरू असलेल्या पावसाने मृत्यूमुखी पडल्या असाव्या. त्या ज्या ठिकाणी मृत्यूमुखी पडल्या त्याच ठिकाणी ही दरड कोसळली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.