घरताज्या घडामोडीअंबेनळी घाटाच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी ; पावसाळ्यातले धोके मात्र कायम

अंबेनळी घाटाच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी ; पावसाळ्यातले धोके मात्र कायम

Subscribe

शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे.

मोठे अपघात,दरडींच्या दुर्घटना, दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक बंद अशी ‘विशेष’ ओळख असलेला पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील अंबेनळी घाट वाहतुकीस पुन्हा खुला झाला आहे.  दीडशे वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला ब्रिटीशकालीन हा घाट रस्ता पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये हा घाट रस्ता वाहतुकीस वेळोवेळी घडलेल्या अपघातांच्या आणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे असुरक्षित आणि जीवघेणा ठरला आहे.

अंबेनळी घाट रस्ता रायगड जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावर येथून सुरू होत असून, तालुक्याच्या हद्दीत याचे अंतर २४ किलोमीटर आहे. घाट रस्ता आड पायटा गावापासून सुरू होतो, तर पुढे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात संपतो. मार्गावर तीव्र चढ-उतार असून, पूर्ण घाटात एका बाजूला डोंगर तर दुसर्‍या बाजूला खोल दरीचा भाग आहे. घाट रस्त्यावर अवघड अति तीव्र वळणे, तसेच एकाच डोंगरावर अनेक वळणे घेत घाट रस्ता डोंगराच्या माथ्यावर पोहचला आहे. या घाट रस्त्यावर किरको ळ अपघाताच्या घटना घडत असत. मात्र प्रामुख्याने २००४ साली फोर्ड गाडीला झालेल्या भीषण अपघातात ७ जणांना जीव गमावावा लागला होता.

- Advertisement -

कोट्यवधीची ‘ही’ कामं अपघात रोखू शकले नाही…

या भीषण अपघाताची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आणि अपघातांच्या घटनांना आळा बसण्यासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांचा निधी घाट रस्त्याच्या दुरुस्तीवर ओतला. संपूर्ण रस्त्यावर रूंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, मोर्‍यांची बांधकामे, सरंक्षक भिंती, कठडे, लोखंडी रेलिंग, डोंगर बाजूला जाळीचे आवरण, डोंगर उत्खन्नन अशी असंख्य कामे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयांतर्गत करण्यात आली. मात्र या दरम्यान २८ जुलै २०१८ साली दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची सहलीला निघालेली बस दाभिळ टोकाजवळ ५०० फूट खोल दरीत कोसळली. यात ३० जणांना प्राणास मुकावे लागले. सहाजिकच कोट्यवधीचे काम अपघात रोखू शकले नाही, असा स्वाभाविक मुद्दा त्यावेळी उपस्थित झाला होता.

…त्यामुळे दरडी कोसळण्याच्या दरवर्षी घटना घडत आहेत

अपघाताची ठिकाणे असलेल्या तीव्र चढ-उताराच्या वळणांची सुधारणा, दरीच्या बाजूला मजबूत रेलिंग किंवा संरक्षक भिंत यासारख्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज अनेकदा व्यक्त झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून घाट बंद झाला नाही, असे कधीच घडलेले नाही. याचे कारण उंचावर असलेल्या महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या पायथ्याशी हा घाट रस्ता असून, या परिसरात माथ्यावर पडणार्‍या पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या डोंगराच्या पोटातील दगडाच्या फटीतून झिरपून दगडाचे तुकडे करण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच मातीही फुगत असते. त्यामुळे सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली किंवा १०० मिलीमीटर पाऊस झाला तर डोंगरापासून माती, दगडधोंडे अलग होत उताराकडे घसरत रस्त्यावर येते. चिरेखिंडपासून वाडा गावापर्यंतच्या अंतरात दरडी कोसळण्याच्या दरवर्षी घटना घडत आहेत.

- Advertisement -

शाश्वत उपाययोजना करण्याची गरज

येथील डोंगरावर वृक्षसंपदा नगण्य असून, डोंगराचे विकास कामासाठी करण्यात आलेले उत्खनन या गोष्ठीही दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. यावर्षी घाटात चिरेखिंड ते वाडा या ४ किलोमीटर अंतरात तीन ठिकाणी महाकाय दरडी कोसळल्या. तसेच पुढे महाबळेश्वर तालुका हद्दीत वाड्यापासून १२ किलोमीटर अंतरात मेटतळेगाव हद्दीच्या अलिकडे ३ किलोमीटरवरही दरडी कोसळल्या होत्या. याकरीता येथील परिसराचा भौगोलिक अभ्यास, पर्जन्यमान, डोंगराची भू वैज्ञानिकाकडून पहाणी आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाने आता पावसाळ्यात दरडी प्रतिबंधक शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे.

वेगवेगळ्या घाटांतील अशी डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी बोगद्यांचा खर्चिक मात्र शाश्वत पर्याय निवडण्यात आला आहे. शेजारच्या कशेडी घाटातही हा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. महाबळेश्वर मार्गावरील प्रवासी आणि माल वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या, तसचे दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली होणारा कोट्यवधींचा चुराडा पाहिला तर या ठिकाणीही बोगद्याचा पर्याय निर्माण केला पाहिजे. जनता आणि प्रवासी, मालवाहतुक करणार्‍या संघटना या धाटाला पर्यायी रस्ता म्हणून पोलादपूर ते कुडपण पुढे कुमठे पार असा रस्ता करावा, अशी मागणी करीत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या घाटाचे मनावर घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दोन महिन्यांनंतर महाड-सातारा, रोहे-कोल्हापूर, बोरिवली-महाबळेश्वर, मुंबई-महाबळेश्वर, ठाणे-महाबळेश्वर, नालासोपारा-झांजवड या एसटी बस सुरू झाल्या आहेत. मात्र महाबळेश्वर हद्दीत वाड्यापासून १०-१२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावरून बससारख्या मोठ्या, तसेच अवजड वाहनांना वळताना अडथळा होत असून, पुलाचे काम पाहता अपघाताची शक्यता वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

वार्ताहर – बबन शेलार


हे ही वाचा – Maharashtra ZP Panchayat Samiti By-Elections Results 2021 LIVE : खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित पराभूत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -