घरताज्या घडामोडीशिक्षक आणि पदवीधर संघात सर्वच पक्षात बंडखोरी

शिक्षक आणि पदवीधर संघात सर्वच पक्षात बंडखोरी

Subscribe

राज्यात होऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी भरण्याचा गुरुवारी शेवटच्या दिवशी जवळपास सर्वच पक्षांना बंडखोरांनी ग्रासल्याने या निवडणुकीची चुरस वाढली आहे.

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेते यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकडून देखील आज पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून आपल्याला महत्त्व दिले जात नसल्याने आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करीत काल अनेकांनी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्ज दाखल करणार्‍या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल आणि त्यांची बंडखोरी निवळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज नागपूरचे महापौर संदीप जोशी ह्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने ह्यावेळी शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीच्या प्रचाराचा मुहूर्त साधला.

- Advertisement -

संदीप जोशी यांनी पक्षाचे नेते आणि ज्यांनी ही जागा अनेक टर्म राखली त्या नितीन गडकरींच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला.

ह्या जागेवर भाजपची टर्म प्राध्यापक अनिल सोले यांनी पूर्ण केली होती आणि ते ही उमेदवारीच्या रेसमध्ये होते. ते जेव्हा इतर नेत्यांबरोबर पोहोचले नाही तेव्हा ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पण शेवटच्या क्षणी जोशी फॉर्म भरत असताना ते पोहोचले आणि भाजपच्याही अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना हुश्श झाले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित वंजारी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार असल्याचा दावा यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची तसेच नागपूर शहरातील स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती खटकणारी होती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी निश्चितच निवडणूक जिंकतील, असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड आहे हा समज दूर करू, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

आज सकाळी दहा वाजता सुमारे ३०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी जीपीओ चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एक छोटी रॅली काढली. काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित वंजारी यांची रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरासमोरून निघूनही त्यात नागूपर शहरातला राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता सहभागी न झाल्याने या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बीडमध्ये पक्षाचे पदवीधर संघातील अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी तर औरंगाबादमधून मुंडे समर्थक प्रवीण घुगे यांनी अर्ज भरला आहे. अमरावती मतदारसंघात भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या बहिणीनेच अर्ज भरल्याने तिथेही बंडखोरी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -