कळवा- ऐरोली एलिव्हेटेड रेल्वेचा मार्ग अखेर मोकळा !

दिघा रेल्वेस्थानक डिसेंबर २०२१ मध्ये सुरू होणार !

western railway

कळवा -ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौरस मीटर जागा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय शुक्रवारी सिडकोने घेतला. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील भार कमी करणार्‍या या महत्वाकांक्षी प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया दोन्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवलीमधून नवी मुंबईत येणार्‍या आणि नवी मुंबईतून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणार्‍या नागरिकांना ठाणे रेल्वे स्थानकात गाडी बदलावी लागू नये यासाठी कळवा – ऐरोली हा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांची नवी मुंबईत शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एम आर व्ही सी चे संचालक विजय नाथावत, एस एस खुराना, प्रकल्पाचे उपव्यवस्थापक एस के चौधरी, साहाय्यक अभियंता सी पी कुलदीप आदी उपस्थित होते.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमआयडीसी आणि राज्य सरकारने आपली जमीन रेल्वेकडे हस्तांतरित केली आहे. फक्त सिडकोची जमीन अद्याप हस्तांतरित झाली नाही. ही जमीन तातडीने हस्तांतरित करावी अशी सूचना खासदार विचारे यांनी सिडकोच्या प्रशासनाला केल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश संजय मुखर्जी यांनी प्रशासनाला दिले. सिडकोच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कळवा- ऐरोली एलिव्हेटेड रेल्वेमार्गाच्या निर्मितीमधील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.

एलिव्हेटेड मार्ग एमआयडीसीच्या आठ हजार चौरस मीटर जागेतून जाणार आहे. सुरुवातीला या जागेची किंमत वाणिज्य दरानुसार आकारण्यात आली होती. मात्र महा विकास आघाडी सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतल्याने एमआयडीसीने आता आपल्या जागेचा दर निम्म्याने कमी केला आहे.