महाडमध्ये मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणार्‍या पालकांचा पर्दाफाश

मुलांचा मामा त्यांना मार देऊन पैसे वसूल करीत होता

Mahad exposes parents for inciting children to beg
महाडमध्ये मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणार्‍या पालकांचा पर्दाफाश

लहान मुले खायला मागत जवळ आली की प्रत्येकाला त्यांची दया येते. हिच बाब हेरून शहराजवळील शिरगाव झोपडपट्टीमधील काही पालकांनी आपल्या कोवळ्या मुलांना शहरात भीक मागण्यास प्रवृत्त केले होते. रस्त्यालगत सावलीत बसून राहून भर उन्हात मुलांना भीक मागण्यास सांगणार्‍या या निष्ठूर पालकांचा पर्दाफाश सजग नागरिकांनी केला आहे.साधारण ६ ते ७ वर्षांची ही मुले रस्त्यावरून भीक मागताना प्रत्येकाला दिसत होती. गेले काही महिने हा प्रकार सुरू आहे. छत्रपती शिवाजी मार्गावर हॉटेल वेलकमजवळ ही मुले सर्रास आढळून येत होती. येणार्‍या जाणार्‍यांकडे ही मुले भाई दहा रुपये द्या, अशी याचना करताना आढळत होती. मुलांच्या चेहर्‍याकडे पाहून येणारा जाणारा विशेषतः मुस्लीम महिला त्यांना सहज पैसे देताना दिसत असत. या मुलांचे पालक सावलीत बसून त्यांकडून पैसे घेण्याचे काम करीत होते. रिकाम्या हाती आलेल्या मुलांना वेळी मार देखील देत होते. मुलांना पैसे सहज दिले जातात हे त्यांच्या लक्षात आले होते.

मुलांचा मामा त्यांना मार देऊन पैसे वसूल करीत होता आणि त्याची दारू देखील ढोसत होता. ही बाब सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिगंबर गीते यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सजग नागरिक पत्रकार नीलेश पवार, निसर्ग हॉटेलमधील शहाबुद्दिन अनवारे, इस्माईल हुर्जुक, शिक्षक मुखत्यार मोटलाणी यांच्या सहाय्याने प्रथम चाईल्ड लाईन या क्रमांकावर फोन केला. या ठिकाणी सविस्तर माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले. उप विभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. पी. खोपडे यांनी दखल घेत कर्मचारी पाठवून दिले. मात्र तोपर्यंत या पालकांनी तेथून पळ काढला होता.

अखेर डॉ. गीते आणि एपीआय पवार, हवालदार प्रकाश विन्हेरकर, गजानन शिंदे यांनी त्यांना शोधून काढले. भीक मागणार्‍या मुलांमध्ये 3 लहान मुले आणि एक मुलीचा समावेश होता. शिरगाव येथील त्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांच्या पालकांचे समुपदेशन पोलीस आणि डॉ. गीते यांनी केले. मुलांच्या आईने पतीचे निधन झाले असून, मला दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले. तर सोबत असलेल्या मुलांचा मामा मात्र जमवलेल्या पैशातून दारू ढोसण्याचे काम करीत होता. समोरून येणार्‍या-जाणार्‍यांकडून पैसे जमा केल्यानंतर ते तात्काळ हा मामा ओढून घेत होता. शिरगाव वस्तीवरील लोखंडी हत्यारांना धार लावण्याचे काम करणार्‍या एकाने आपल्या लहान मुलाला यांच्यासोबत पाठवले होते. त्याला देखील पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

धडधाकट पालक आलेल्या संकटावर मात करण्याचे धाडस न दाखवता कोवळ्या मुलांना भीक मागण्यास सांगून पोट भरत असल्याने त्यांना पकडून दिल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हे काम यापूर्वीच या नागरिकांकडून होणे आवश्यक होते, असे डॉ. गीते यांनी सांगितले. यापुढे देखील असे प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास आपल्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 


हे ही वाचा- NCB raid on Mumbai cruise : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी