घरसंपादकीयओपेडपाठ्यपुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याचा विचार की अविचार!

पाठ्यपुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याचा विचार की अविचार!

Subscribe

दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत देशातील काही राज्ये पावले टाकत आहेत. महाराष्ट्र राज्यानेदेखील तसे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून यापूर्वी सर्व पुस्तकांचे विभाजन करून एकात्मिक पुस्तके तयार करणे, तसेच पहिली व दुसरीसाठी एकात्मिक पाठ्यक्रमाची रचना करत पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय पाठ्यपुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याबाबत विचार सुरू केला आहे. हा विचार प्रत्यक्षात व्यवहार्य आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. प्रत्येक पाठ्यपुस्तकात आणि प्रत्येक पाठाखाली किती पाने असावीत? विद्यार्थ्यांना या पानांचा खरंच उपयोग होईल का ? अभ्यास करताना विद्यार्थी यात नोंदी करतील का? यामुळे वह्यांचा वापर थांबेल का ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने समाविष्ट करण्याची गरज व्यक्त केली आहे. अर्थात या संदर्भातील निर्णय अंतिम झालेला नाही. त्यासंदर्भात तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी लोकांची मते जाणून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या वतीने नवमाध्यमांचा उपयोग करत सर्वेक्षणासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरेतर शिक्षणमंत्र्यांची कल्पना चांगली असली तर लोकशाही मार्गाने मते जाणून घेण्याची भूमिका महत्वाची आहे. शेवटी शिक्षण व्यवस्थेत जे मनुष्यबळ काम करत असते त्यांच्या अनुभवातून येणारी मते देखील महत्वाची ठरतात. त्यामुळे वहीची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय काही अंतिम झाला आहे असे नसले तरी, त्या संदर्भाने मात्र मोठी चर्चा सुरू झाली आहे. खरंतर अशा स्वरूपाची चर्चा सुरू होणे, लोकांची विविध स्वरूपाची मते व्यक्त होणे हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलेच म्हणायला हवे. शिक्षणातील निर्णय लोकशाहीच्या मार्गाने घेण्याची प्रक्रिया महत्वाची मानायला हवी.

- Advertisement -

देशात 1993 पासून विद्यार्थ्यांच्या मस्तकी असलेले ओझे कमी करण्या संदर्भाने सातत्याने चर्चा होते आहे. प्रो.यशपाल यांनी विद्यार्थ्यांच्या मस्तकी असलेल्या अध्ययनाचे ओझे कमी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. देशात अध्ययनाचे ओझे कमी करण्याबाबत फारसे प्रभावी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत हे वास्तव आहे, मात्र दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत देशातील काही राज्ये पावले टाकत आहेत. महाराष्ट्र राज्यानेदेखील तसे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून यापूर्वी सर्व पुस्तकांचे विभाजन करून एकात्मिक पुस्तके तयार करणे, तसेच पहिली व दुसरीसाठी एकात्मिक पाठ्यक्रमाची रचना करत पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय पाठ्यपुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याबाबत विचार सुरू केला आहे. हा विचार प्रत्यक्षात व्यवहार्य आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रत्येक पाठ्यपुस्तकात आणि प्रत्येक पाठाखाली किती पाने असावीत? विद्यार्थ्यांना या पानांचा खरंच उपयोग होईल का ? अभ्यास करताना विद्यार्थी यात नोंदी करतील का? यामुळे वह्यांचा वापर थांबेल का ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पाठ्यपुस्तकातील पाने ही नोंदी करण्यासाठी, प्रश्नोत्तरे लिहिण्यासाठी उपयोगात आणायची आहे.गोरगरिबांच्या मुलांना वह्या विकत घेणे परवडत नसल्याने शिक्षणात अडथळे येतात. यासाठीच शासन स्तरावर नवी योजना म्हणून पाठ्यपुस्तकात पाने समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे. मंत्री महोदयांनी आपली भूमिका प्रतिपादन केली आहे. गरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा मदतीचा हा भाग असला तरी त्या संदर्भाने काही प्रश्न निर्माण केले जात आहेत.
पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने समाविष्ट केलेली पुस्तके बाजारात आणली गेली तर त्या पुस्तकांचे आयुष्य अवघे एक वर्षापुरतेच उरणार आहे. त्यामुळे दरवर्षी नवे पुस्तके विद्यार्थ्यांना हाती द्यावी लागतील. खरंतर पुस्तकांचे आयुष्य कमी होणे म्हणजे आपण निर्सगाची मोठी हानी करत तर नाही ना? याचा विचार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

खरेतर निम्न प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना वजा केले तरी तिसरी ते आठवीपर्यंतच्या स्तरावरील पाठ्यपुस्तकांचे आयुष्य उंचवायला हवे. किमान तीन वर्षे तरी पाठ्यपुस्तके उपयोगात आणली जायला हवीत.आजही ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पाठ्यपुस्तके मिळत नाहीत. तेव्हा शाळा स्तरावर अनेक शिक्षक जुन्या पाठ्यपुस्तकांचे संकलन करून तीच पुन्हा उपयोगात आणतात. त्यामुळे ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या मदतीला येत असतात. अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नवी व जुनी पाठ्यपुस्तके उपयोगात आणत असतात. त्याचा भाग म्हणून नवी पुस्तके शाळेत आणि मागील वर्षीच्या मुलांची जमा केलेली पाठ्यपुस्तके घरी ठेवली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पुस्तकांचे वजन कमी होते. आजही आपल्याकडे पाठ्यपुस्तकाशिवाय शिक्षणाची कल्पना केली जाणे शक्य नाही. पाठ्यपुस्तक हेच शिक्षणाचे एकमेव माध्यम आहे. आजही पाठ्यपुस्तकातील आशयाचा विचार केला जातो.

पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अडचणींचा, अडथळ्यांचा, त्रासदायकच ठरणार असल्याचे शिक्षकांचे मत आहे. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठानंतर किती पाने जोडायची हे ठरविणे काहीसे कठीण आहे. प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या क्षमता, त्याचे पूर्वानुभव भिन्न आहेत. त्यामुळे एखादा प्रश्न विचारला गेला तर त्याची उत्तरे प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेने देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता गृहीत धरून आपण निर्णय घेतला तर काही विद्यार्थ्यांना पाने पुरेशी ठरणार नाही आणि काही विद्यार्थ्यांना पाने अधिक ठरण्याची शक्यता आहे. गणितासाठी लागणार्‍या चौकटी, कोर्‍या स्वरूपातील व रेषा आखलेली अशी भिन्न स्वरूपाची पाने गरजेची असतात ती समाविष्ट करणे काहीसे कठीण आहे. अनेकदा एखादे उत्तर चुकले तर ती पाने निकामी ठरतात. वहीत ते पुढील पानावर लिहिली जातात.

प्रत्येक विद्यार्थी विविध अंगाने विचार करत असतो, त्यामुळे त्याची उत्तरापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया भिन्न असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पानांची संख्या निर्धारित करणे योग्य ठरणार नाही. त्यातून मुलांच्या कल्पानांना काहीशा मर्यादा पडू शकतील. पुस्तकातील पाने दरवर्षी लिहिली गेली तर पाठ्यपुस्तके पुन्हा उपयोगात येण्याची शक्यता नाही. आज पाठ्यपुस्तकावर काहीच लिहिले जात नाही. लिहिले गेले तर केवळ विद्यार्थ्याचे नाव लिहिले जाते. त्यामुळे पाठ्यपुस्तके जरी जुनी झाली तरी ती पुन्हा पुन्हा उपयोगात आणली जातात. ती उपयोगात आणताना फारसे दुःख नाही. मात्र आता लिहिलेली पाने असलेली पुस्तके मुलांसाठी उपयोगात आणली गेली तर विद्यार्थ्यांना पुस्तके वापरण्याचा आनंद मिळण्याची शक्यता नाही. आता पाठ्यपुस्तकात कोर्‍या पानांचा समावेश केला तर त्या संख्येमुळे सध्याच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठसंख्या वाढेल. परिणामी, पाठ्यपुस्तकाचे वजन वाढेल. त्यातून दप्तराचे ओझेही वाढेल. पाठ्यपुस्तकात वहीची पाने समाविष्ट केल्याने पुस्तकाचे आयुष्य कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

खरंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासोबत स्वतंत्र वह्या देण्याची गरज शिक्षकांनी व्यक्त केली आहे. वह्यासुध्दा विषय निहाय न देता भाषा, समाज अभ्यास व शास्त्र अशा वह्यांची रचना करण्याची गरज आहे. त्या वह्यादेखील सत्र निहाय असायला हव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्याची शक्यता आहे. वर्गपाठाप्रमाणे गृहपाठाच्या वह्याही विषय निहाय न करता विषय गटानुसार करता आल्या तर वजन कमी होण्यास मदत होईल.अर्थात शासनाने अशा वह्या पुरविण्याऐवजी स्वाध्याय पुस्तिका पुरविण्यात याव्यात अशी मागणी पुढे आली आहे. स्वाध्याय पुस्तिका समग्रतेने विचार करून निर्माण करण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकात असलेल्या प्रश्नांचा समावेश करत तसेच अतिरिक्त प्रश्नांचाही समावेश करण्याची गरज आहे. त्याचा परिणाम अत्यंत चांगल्या स्वरूपात समोर येण्यास मदत होणार आहे. स्वाध्याय पुस्तिका समग्रतेने निर्माण केल्या तर पाठ्यपुस्तकातील सध्याची असलेली प्रश्नांसाठीची पाने कमी होण्यास मदत होईल.

पाठ्यपुस्तके केवळ पाठाच्या आशयापुरता मर्यादित राहतील. पाठ्यपुस्तकांची पानेदेखील कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे पाठ्यपुस्तकांबद्दल मुलांच्या मनात सध्याची असलेली भीती कमी होण्यास मदत होईल. स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना स्वाध्याय करणे काहीसे सोपे होईल. शिक्षकांना त्या प्रश्नांच्या मदतीने मूल्यमापनासाठी विचार करणे शक्य आहे. शिक्षकांना त्याचा उपयोग करणे सुलभ होईल. पालकांनादेखील त्याची मदत होईल. विद्यार्थ्यांना देखील स्वाध्याय पुस्तिकांचा उपयोग शिक्षणाच्या दृष्टीने निश्चित होईल. त्यादृष्टीने शासनाने विचार करण्याची गरज आहे. अशा स्वरूपात समग्रतेने विचार करत बदलाची पावले टाकली तर त्याचे स्वागतच होईल. ती पावले सूक्ष्मतेने टाकली गेली तर परिवर्तनाची पावले निश्चित राज्याच्या हिताची ठरण्याची शक्यता आहे.

शासनाने पुरविलेली पाठ्यपुस्तके उपयोगात आणण्याचा कालावधी तीन वर्षे तरी करायला हवा. त्यामुळे पर्यावरणालाच मदत होईल. त्यातून बचत होणार्‍या पैशाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी लागणार्‍या पुस्तकांची निर्मिती आणि खरेदी करण्यासाठी केला गेला तर शासकीय शाळांची ग्रंथालये समृध्द होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. शासनाने पर्याय देण्याच्या केलेल्या विचाराचे स्वागत करायला हवे. कोणतीही नवी गोष्ट स्वीकारताना विरोध होतो, मात्र त्यापलीकडे त्या संदर्भाने चर्चा होणे हे अधिक स्वागतार्ह मानायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -