बाईक चोरीच्या संशयातून मारहाण; पोट भरण्यासाठी नेपाळहून आलेल्या तरुणाचा मृत्यू

Mob Lynching

मोटरसायकल चोरीच्या संशयातून चायनिज गाडीवर काम करणाऱ्या एका तरुणाची १० ते १२ जणांच्या जमावाने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कल्याण येथील विठ्ठलवाडी परिसरात उघडकीस आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी १० ते १२ जणांच्या जमावाविरुद्ध हत्या आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत लालू परियार (३०) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भरत हा मूळचा नेपाळमध्ये राहणारा असून १५ दिवसांपूर्वी तो पोट भरण्यासाठी कल्याण येथे आला होता. एका व्यक्तीच्या ओळखीने भरत कल्याण पूर्व चिंचपाडा या ठिकाणी असलेल्या साई पूजा हॉटेलमध्ये कामाला लागला होता.

काही दिवसांपूर्वी नेवाळी येथून चोरीला गेलेली मोटरसायकल भरत काम करीत असलेल्या हॉटेल समोर उभी होती. सोमवारी या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या मोटरसायकल मालकाला चोरीला गेलेली मोटरसायकल हॉटेल समोर उभी दिसली. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या भरत परियार याने मोटरसायकल चोरली या संशयातून मोटरसायकल मालकाने आपल्या सहकाऱ्यांना बोलावून चिंचपाडा येथे आलेल्या दहा ते बारा जणांच्या जमावाने भरत परियार तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १६ वर्षाच्या मुलासह तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर भरत याला लाठ्याकाठयाने मारहाण करून नेवाळी अंबरनाथ येथे घेऊन आले. तेथे त्याला मारहाण करून गाडीतून बाहेर फेकून दिले.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भरत परियार आणि इतर दोघांना नजीकच्या रुग्णलायत दाखल केले असता भरत मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दहा ते बारा जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हेगारी कृत्य करणे, मारहाण करणे, अपहरण, हत्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी आपलं महानगरशी बोलतांना सांगितले.