माणगावसह रोहे हादरले ; अवघ्या ३ वर्षीय बालकाची निर्घृण हत्या

आरोपीला गुजरात सीमेवर अटक

Mangaon : murder of a 3 year old child
माणगावसह रोहे हादरले ; अवघ्या ३ वर्षीय बालकाची निर्घृण हत्या

माणगाव येथून अपहरण करण्यात आलेल्या अवघ्या ३ वर्षीय बालकाची तालुक्यातील चणेरे येथे हत्या झाल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून अटक केली आहे. रुद्र यादव असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, माणगाव तालुक्यातील बोर्ले येथून घरासमोरील अंगणातून आरोपी संतोष अशोक यादव (३०) याने गाडीवर फेरफटका मारण्याच्या बहाण्याने त्याचे गेल्या मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजता अपहरण केले. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात २३०/२०२१, भादंवि कलम ३६३ अन्वये करण्यात आली होती. त्यानुसार मुलाचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी आवाहन करूनही मुलाचा शोध दोन दिवसानंतरही लागला नव्हता. मात्र आरोपी संतोष याला गाडीसह शहरात पाहिल्याचे अनेकांनी सांगितले आणि त्यानंतर येथील पोलिसांनीही शोध सुरू केला. आरोपीने आरे खुर्द गावच्या हद्दीत लहानग्याला मारून टाकले, असेही एका व्यक्तीने पाहिल्याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान आरोपीने येथील एसटी बस स्थानकात त्याची मोटरसायकल (एमएच ०६ बीएक्स ८८२४) बुधवारी सोडून दिल्याचे समोर आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष यादव याला गुजरात-महाराष्ट्र सीमेवर पकडले आणि बोलते केले. त्यात त्याने आपण हे घृणास्पद कृत्य केल्याचे कबूल केले. रोहे-चणेरे रस्त्यालगत आरे खुर्द येथील गणपती घाट विसर्जनाच्या काटेरी झाडीत रुद्र सापडला. या कोवळ्या जीवाची हत्या करून आरोपीने तेथून पळ काढला खरा, मात्र पोलिसांनी त्याच्या वापी येथे मुसक्या आवळल्या.

शुक्रवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर यावर रुद्रचे शेजारी किंवा इतर ग्रामस्थही फारसे बोलायला तयार नसले तरी हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याची कुजबूज आहे. मृतदेह विच्छेदनासाठी येथील उप जिल्हा रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी तो मुंबईत जे. जे. रुग्णालयात पाठविण्यास सांगितले. या प्रकरणाची अधिक चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.

वार्ताहर – अमोल पेणकर


हे ही वाचा – Aryan Khan Bail : आर्यन खानची आजची रात्रही आर्थर रोड जेलमध्येच, जेल अधिक्षकांची माहिती