दोन दिवसापासून कुर्लापूर्व येथून बेपत्ता असलेल्या ३६ वर्षीय विवाहित आणि तिचा साडेतीन वर्षाचा मुलाचा मृतदेह चेंबूर येथील लालडोंगर परिसरात असणाऱ्या नाल्यात मिळून आला आहे. या विवाहितेने मुलासह नाल्याजवळ असणाऱ्या इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यत घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
श्रुती यशराज महाडिक (३६) आणि राजवीर (साडे तीन वर्ष ) असे मृतदेहाची नावे आहेत. श्रुती ही कुर्ला पूर्व येथील कामगार नगर येथे राहण्यास होती. श्रुतीचे माहेर चेंबूर लालडोंगर परिसरात आहे. १२ जानेवारी रोजी दुपारी श्रुती ही साडेतीन वर्षाच्या मुलासह घरातून बेपत्ता झाली होती, तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र तिचा शोध न लागल्यामुळे नेहरू नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
नेहरू नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तिचा शोध घेतला असता ती चेंबूर लालडोंगर येथे जात असल्याचे दिसून आले, त्यानंतर पोलिसांनी तिच्या माहेरच्या इमारतीचे फुटेज तपासले असता श्रुती इमारतीच्या आता जाताना दिसत होती, मात्र बाहेर पडताना दिसून न आल्यामुळे पोलिसांनी इमारतीच्या परिसरात तिचा शोध घेतला असता इमारत आणि डोंगराच्या मध्ये असलेल्या नाल्यात शुक्रवारी दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रुती ही माहेरी आली मात्र तिने घरी न जाता इमरतीच्या गच्चीवर जाऊन मुलासोबत उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नेहरू नगर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला असून श्रुतीच्या वडिलांचा जबाब नोंदवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रुतीने घरगुती वादातून आत्महत्या केली शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक तपास सुरु आहे.
हेही वाचा – Crime News : घरफोडीनंतर थेट विमानाने पोहोचले नेपाळला, 48 तासांत आंतरराष्ट्रीय गँगचा पर्दाफाश