खा.नरेश म्हस्के भिरकलेच नाहीत # माजी खासदार राजन विचारे यांनी या उन्नत मार्गाच्या कामांसाठी पुढाकार घेत त्यांच्या कारकिर्दीत अनेक विभागाकडून परवाना मिळवून दिला होता. सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र विद्यमान खासदार नरेश म्हस्के हे पक्षीय कार्यक्रम वगळता निवडणूक झाल्यापासून समस्या, उन्नत मार्गाच्या पाहणीसाठी नवी मुंबईत एकदाही भिरकले नाहीत. त्यामुळे रेल्वे विषयक कामे रेंगाळल्याचे एमएमआरडीएच्या काही अधिकार्यांनी सांगितले.
नवी मुंबई : ज्ञानेश्वर जाधव
मुंबई मार्गी थेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणार्या ‘ऐरोली-कटाई’ उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसर्या उच्च दाबाच्या मोनोपोल इलेक्ट्रिक टॉवरचे काम पुर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत या पुलाचे काम पुर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीएने डोळया समोर ठेवले आहे.
मुंबई व नवी मुंबईला कल्याण-डोंबिवलीसह भिवंडी आणि अंबरनाथ-बदलापूरला जोडणारा हा पुल फ्री-वे प्रवासासाठी खुला झाल्यानंतर कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांचा होणार आहे.

डोंबिवली, कल्याणकडे जाण्यासाठी पुर्वी कळवा-मुंब्रा शिळफाटा मार्गी जावे लागत होते. त्यानंतर कोपरखैरणे महापे मार्गात शिळफाटयाच्या रस्त्यावर पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र त्यानंतरही मुंबई, नवी मुंबईवरील ताण तितकासा कमी झाला नाही. मुंबईतून थेट प्रवासाठी एमएमएआरडीएने मे २०१८ मध्ये ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या कामाचा श्री गणेशा करण्यात आला.पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग (जोड) क्रमांक ४ हा ३.४३ किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता बनविण्याचे नियोजन करण्यात आले. कोरोनाचा कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबर सिडको, वनविभाग आणि सीआरझेडची परवानगी, रेल्वे ट्रॅकवर गर्डरसाठी परवानगी, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.
या ठिकाणी महावितरणच्या केबल वाहक विद्युत वाहिन्या जुनाट आणि कमी उंची असल्याने अडसर निर्माण झाला होता. भविष्यात अवजड उंच वाहनांची वर्दळ सुरु झाल्यास होणारा त्रास आणि गर्डर टाकण्याकरीता उन्नत मार्गातील ऐरोली सेक्टर-३ पोस्ट कार्यालयाजवळ पालिकेच्या उद्यानातून गेलेल्या विद्युत वाहिन्या काढून चार ठिकाणी नव्याने मोनोपोल इलेक्ट्रिक टॉवर उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १६ पीएससी आय गर्डर बसविण्यात आले आहेत. तर १५ दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल करुन मोनोपोल टॉवर उभारला आहे. त्यामुळे आता ऐरोली रेल्वे स्थानकानजीक गर्डर टाकल्यानंतर उन्नत मार्गातील अत्यंत महत्वाचा टप्पा पुर्ण होणार आहे, अशी एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी दिली.